नागपूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला. लोकसभा निवडणुकीत दिसणारा कल विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे बदलल्याची प्रतिक्रिया या निकालांवर व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात अनेक दावे-प्रतिदावेही केले गेले. या निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप राज्यातील विरोधी पक्षांकडून अर्थात महाविकास आघाडीकडून करण्यात येत होते. शुक्रवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबाबत सविस्तर आकडेवारी देऊन तीन महत्त्वाचे प्रश्न निवडणूक आयोगाला केले आहेत.

राहुल गांधी यांच्या  टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर होणार असून यामध्ये काँग्रेस पक्ष पराभूत होणार आहे. त्यामुळे आपल्या अपयशावर पांघरून घालण्यासाठी नको ते आरोप राहुल गांधींकडून केले जात असल्याचे फडणवीस म्हणाले.

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीतील मतदारांची संपूर्ण आकडेवारी दिलेली आहे. त्यात कुठे किती मतदार वाढले हे सांगण्यात आले.  त्यामुळे राहुल गांधी यांनी असे आरोप करण्यापेक्षा आत्मचिंतन करणे अधिक आवश्यक आहे. अशा आरोपांमधून त्यांच्या खोट्या मनाची समजूत होईल पण जनता त्यांना कधी स्वीकारणार नाही असेही  मुख्यमंत्री म्हणाले. या संदर्भात निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिल्यामुळे पुन्हा याबाबत उत्तर देण्याची गरज नाही. ८ तारखेला  दिल्ली विधानसभा निवडणूक  निकालानंतर त्यांच्या पार्टीचे नाव संपणार असल्यामुळे राहुल गांधी त्यादिवशी काय बोलणार, त्याचा सराव ते आतापासून करत असल्याचा टोला  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला.  राहुल गांधी यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला आहे. ते नागपूर येथे बोलत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी यांची मागणी काय?

राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे मतदार याद्या देण्याची मागणी केली. “आम्ही निवडणूक आयोगाला हे सांगत आलोय. आम्हाला राज्यातल्या मतदारयाद्या हव्यात. त्यात मतदारांची नावं, पत्ते आणि फोटो हवेत. आम्हाला लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्या हव्यात. आम्हाला हे पाहाचंय की हे नवे मतदार कोण आहेत? अनेक मतदारांची नावं गाळण्यात आली. अनेक मतदारांची नावं एका बुथमधून दुसऱ्या बुथमध्ये समाविष्ट करण्यात आली. यातले बहुतेक मतदार हे दलित, आदिवासी, अल्पसंख्याक गटातले होते. आम्हाला हे समजून घ्यायचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले.