लोकसत्‍ता टीम

अमरावती : बडनेराचे युवा स्‍वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांनी दर्यापुरात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्‍या विरोधात त्‍यांच्‍या पक्षाचा उमेदवार रिंगणात आणला आहे, तर अमरावतीत राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या (अजित पवार) उमेदवार सुलभा खोडके यांच्‍या विरोधात भूमिका घेतली आहे. त्‍यावरून मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी रवी राणा यांना खडसावले आहे.

दर्यापूर येथील शिवसेनेचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्‍या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकू नका, असे आवाहन रवी राणा यांना केले. एकनाथ शिंदे म्‍हणाले, रवी राणा हे महायुतीचे घटक आहेत. महायुतीत सरकार त्‍यांच्‍या बाजूने उभे राहिले आहे. म्‍हणून राज्‍यात आपले सरकार आणण्‍यासाठी अभिजीत अडसूळ देखील आपल्‍याला पाहिजे आहेत. त्‍यामुळे रवी राणांनी महायुतीची शिस्‍त पाळली पाहिजे. महायुतीत राहायचे आणि महायुतीच्‍या विरोधात काम करायचे, हे कुणीही करता कामा नये, असे आवाहन मुख्‍यमंत्री म्‍हणून मी करीत आहे. राज्‍यात महायुतीचे सरकार येणार आहे. हे सरकार आणण्‍यासाठी ज्‍यांनी योगदान दिले, त्‍यांचा सन्‍मान झाल्‍याशिवाय राहणार नाही.

आणखी वाचा-नवनीत राणा म्‍हणतात, “…त्या नेत्यांचा हिशेब करा”, प्रचार वाहनाची जोरदार चर्चा

एका सभेत बोलताना रवी राणा यांनी अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही होत नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. याच वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून रवी राणा यांची कानउघडणी करण्यात आली आहे.

अजित पवार म्‍हणाले, लोकांना फार नकारात्मक बोललेले आवडत नाही. जनता फार सकारात्मक विचार करत असते. आम्ही देखील एकेकाळे राणांचे समर्थन केले आहे. पण राणा यांनीच स्वतःच्या बोलण्यातूनच पत्नीचा पराभव करून घेतला. रवी राणा यांनी आता तरी बोलताना काळजी घ्यायला हवी. त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात देखील उमेदवार दिला आहे. त्यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे. त्यांना समजून सांगायला हवे, रवी राणांची ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ झाली आहे.

आणखी वाचा-भाजप आमदारांच्या प्रतिमेला चपलांचा हार, झेंडेपार लोह खाणीचा मुद्दा तापला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवी राणा यांना देवेंद्र फडणवीस यांनी समजून सांगायला हवे आणि महायुतीत अंतर पडणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला आहे.