बुलढाणा : ‘इंडिया’ आघाडीकडे ना झेंडा आहे ना अजेंडा आहे, एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे नेताच नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाण्यात आले होते.

नियोजित वेळेपेक्षा साडेतीन तास उशिरा दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओंकार लॉन्स येथील महायुती कार्यकर्ता मेळाव्यास मार्गदर्शन केले. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय शिरसाट, राजेन्द्र शिंगणे, संजय कुटे, आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, माजी आमदार विजयराज शिंदे, तोताराम कायंदे, शशिकांत खेडेकर, धृपदराव सावळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा…एसटी बसवर महायुतीच्या विजयाचे आवाहन; ग्रामस्थांनी अडवले वाहन…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांच्या काळात देशाची चौफेर प्रगती केली, सामान्यांसाठी अनेक योजना राबविल्या. देशाचा नावलौकिक इतका वाढविला की, आज भारत बोलते अन् जग हलते, अशी स्थिती आहे. यामुळे केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार, पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान होणार, ही देशातील कोट्यवधी जनतेची ‘गॅरंटी’ आहे. दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकही आरोप झाला नाही, भ्रष्टाचार झाला नाही. केंद्रातील व राज्यातील सरकार काम करणारे, न्याय देणारे, सर्वसामान्यांचे सरकार आहे. विरोधकांकडे मुद्देच नाही.

‘दयनीय परिस्थितीला उद्धव ठाकरेच जबाबदार’

आजच्या दयनीय परिस्थितीला उद्धव ठाकरेच स्वतःच जबाबदार आहेत. त्यांनीच बाळासाहेबांच्या तत्त्वांशी गद्दारी, बेईमानी केली. यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात उठाव केला. कालानंतराने शिवसेना आमची, धनुष्यबाण आणि पक्ष आमचाच, हे आयोग, न्यायालय व विधानसभा सभापतींच्या निकालाने सिद्ध झाले. त्यामुळे आमचीच शिवसेना असली असल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

हेही वाचा…“विजय वडेट्टीवार यांचे जात प्रमाणपत्र तपासा,” महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाची मागणी; खोट्या स्वाक्षऱ्या करून काँग्रेसला पाठिंबा दिल्याचा आरोप

‘उबाठा’ नव्हे ‘उठबस सेना’

उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये भाजपशी गद्दारी करून अनैसर्गिक युती केली. अडीच वर्षे घरातूनच कारभार केला, कामेही केली नाही आणि आम्हाला कायम दुर्लक्षित केले. यामुळे आम्ही उठाव केला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठासून सांगितले. त्यांची ‘उबाठा’ म्हणजे पवार सांगते उठ, काँग्रेस सांगते बस, अशी ‘उठबस सेना’ झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.