नागपूर : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात गुन्हेगार ‘हायटेक’ बनले आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात तंत्रज्ञानाचा पाहिजे तेवढा वापर होताना दिसत नाही. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने २०२३ मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार पोलीस आयुक्तालय क्षेत्रात बालकांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तीन वर्षांत अपहृत बालकांपैकी ९१ बालकांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. अपहरणाच्या या घटनांनी नागपूरकर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
अपहरण होणाऱ्या बालकांमध्ये नवजात बालकांपासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. अनेक वेळा घरातील वाद, राग, भीती किंवा अंधश्रद्धा यामागे असतात. तर काही प्रकरणात भ्रमणध्वनी आणि समाज माध्यमांचे व्यसन नवीन कारण ठरत आहे. अपहरण केलेल्या मुलांना बालमजुरी तर बालिकांच्या नशिबी कुंटणखाना येण्याचा धोका असतो. अशा घटना टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेऊन नव्या तपास पध्दतीसाठी पोलिसांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
पोलीस ठाण्यात पालकांनी बालके बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवताच तपासाचे चक्र सुरू होते. बेपत्ता बालकांचा पोलीस परिसरासह इतर शक्यता असलेल्या ठावठिकाणांचा शोध घेतात. त्यामुळेच अपहरण झालेल्या बालकांचा शोध लागण्याचे प्रमाणही समाधानकारक असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, अशा वेळी बालकांचा शोध घेताना स्मार्ट तंत्राचा वापर करणे काळाची गरज झाली आहे.
राज्यात लाखात २० मुले अपहरणाच्या जोखमीवर
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार २०२३ मध्ये राज्यात १३ हजार १५० बालकांचे अपहरण झाले. त्यात ८,९५० मुली आणि ३,३०० मुले होती. राज्यात दर लाख मुलांमागे २० अपहरण होतात. हा आकडा चिंतेचा विषय आहे. पोलीस यंत्रणांनी ‘फेस रेकग्निशन’, ‘एआय-ट्रॅकिंग’ आणि ‘लोकेशन मॉनिटरिंग’चा वापर केल्यास हरवलेली बालके शोधणे अधिक सुलभ होईल.
उपराजधानीतील अपहरणाचे वर्षनिहाय चित्र
वर्ष- एकूण बालके – मुले – मुली
२०२२- ४४५- १२६- ३४१
२०२३- ५०२- १५७- ३८३
२०२४- ५३१- १८७- ३७१
जानेवारी–सप्टेंबर (२०२५)-३८२-११२-२८६
