नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आवारात सुरू असलेल्या बांधकामावर कोवळ्या वयातील बालकांकडून श्रमाची कामे करून घेतल्या प्रकरणात जिल्हा बाल संरक्षण विभागाची कारवाई केली. बांधकामस्थळावरून पथकाने ७ अल्पवयीन बालकामगारांचीही सुटका केली. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे कैलाश पडोळे यांनी जिल्हा बाल संरक्षण विभागाकडे ही तक्रार केली होती. त्या आधारे ट्रस्ट, बाल हक्क संरक्षण विभाग, चाइल्ड लाईन आणि अजनी पोलीस ठाण्याने ही संयुक्त कारवाई करत बांधकामावर जुंपलेल्या ७ अल्पवयीन बालकामगारांची खात्री केल्यानंतर १०९८ वर गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व अधिकाऱ्यांसह छापा टाकून ७ अल्पवयीन मुलांना वाचवण्यात आले.

बालकामगार म्हणून बांधकामावर जुंपलेली ही सर्व अल्पवयीन मुले बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील आहेत. गावातील एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडे काम करण्यासाठीती नागपूरला आली होती. येथे मुले धोकादायक काम करताना दिसली. अजनी पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर या प्रकरणी कंत्राटदार आणि पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. सुटका केलेल्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या जिल्हा समन्वयक शाहिना शेख, बाल तस्करी आणि बाल कामगार समन्वयक कैलाश पडोळे, सामुदायिक सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी चौरे, चाइल्ड लाइन प्रतिनिधी श्वेता कोटी आणि अजनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीनाशी दुःष्कर्म

लग्नाच्या आमिष दाखवत गेल्या ४ वर्षांपासून अल्पवयीन मुलीशी शारिरीक संबंध ठेवल्यानंतरही लग्नास नकार देणाऱ्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी एकाला शनिवारी अटक केली. कपिल नगर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना उघडकीस आली. हिमांशू उके (२३) असे अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. हिमांशू हा पिडीताचा नातेवाईकच आहे. पीडिता सध्या २० वर्षांची असली तरी ४ वर्षांपासून हिमांशू तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंध ठेवत होता. मुलीने लग्नासाठी आग्रह धरला असता हिमांशूने नकार दिला. अखेर मुलीने कपीलनगर पोलीसठाणे गाठत त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉक्सोच्या कलमांखाली गुन्हा दाखल करत हिमांशू उकेला अटक केली.