आजही जगात जिवाणू-विषाणूच्या संक्रमणाने होणाऱ्या मृत्यूंपैकी निम्या जिवाणू-विषाणूची कुणालाही माहिती नाही. या अनोळखी जिवाणू- विषाणूचा उपराजधानीतील सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (सिम्स) अभ्यास होणार आहे. अमेरिकेच्या बिल आणि मिलिंडा गेट्स फाऊंडेशनने या प्रकल्पासाठी भारतातील एकमात्र सिम्स या संस्थेची निवड केली आहे.

प्रकल्पाअंतर्गत मध्य भारतातील जिवाणू-विषाणूच्या तपासणीनंतर आजाराचे निदान न झालेल्या रुग्णांचे डीएनए आणि आरएसएचे संशोधन सिम्समध्ये केले जाईल. त्यासाठी २०० हून अधिक रुग्णांवर तपासणी केली जाणार असून, हा प्रकल्प सुमारे दोन वर्षे चालणार आहे. त्यासाठी सिम्समध्ये एक जनुकीय चाचणी करणारे सिक्वेन्सर घेण्यात आले आहे. या सिक्वेन्सरमुळे येथील रुग्णांच्याही आजाराचे झटपट निदानासह जनुकीय बदल तातडीने डॉक्टरांच्या निदर्शनात येऊ शकेल. या संशोधनामुळे कुणालाही माहिती नसलेल्या जिवाणू-विषाणूची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांना कळू शकेल.

हेही वाचा – नागपूर: पोलीस उपनिरीक्षकासह व्यापाऱ्याने ‘व्यंकटेश बिल्डर्स’कडून उकळली सव्वा कोटींची खंडणी

नवीन जिवाणू-विषाणूची माहिती पुढे आल्यास विविध आजारांनी होणारे मृत्यू वेळीच उपचाराने कमी होण्यास मदतही होईल, असे सिम्सचे संशोधन संचालक डॉ. राजपाल सिंग कश्यप यांनी दिली. हा प्रकल्प जगातील पाच ते सात केंद्रात होणार असून त्यात बेल्जियमचे एक केंद्र, भारतातील एका केंद्रासह इतरही देशातील प्रत्येकी एक केंद्र राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. दिनेश काबरा म्हणाले, कोणतेही संक्रमण प्रथम रक्तात व त्यानंतर शेवटी मेंदूत पोहोचते. त्यामुळे, पहिल्या टप्प्यातच जिवाणू-विषाणूचे निदान होऊन संबंधित रुग्णावर या प्रकल्पामुळे उपचार शक्य होईल. डॉ. अमित नायक म्हणाले, ‘मेनिंगोएन्सेफलायटीस’ (एमई) मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवती असलेल्या पडद्याच्या जवळ जिवाणू-विषाणू आणि बुरशीच्या प्रजातींमुळे होते. देशात या आजारामुळे बरेच मृत्यू होतात. या मृत्यूंचे कारण असलेल्या जिवाणू-विषाणूंची माहिती या प्रकल्पातून कळू शकेल.

हेही वाचा – नागपूर: कुलगुरूंची पुन्हा दडपशाही!, पदवीधरांच्या निवडणुकीआधीच अधिसभा बैठकीचा घाट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. अलीअब्बास हुसेन आणि डॉ. अमित नायक म्हणाले, बिल गेट्स फाऊंडेशनचा जिवाणू- विषाणूंवर खूप अभ्यास आहे. त्यांच्याकडे या सगळ्यांची मोठी यादी आहे. त्यांच्या ‘साॅफ्टवेअर’मध्ये भारतातील नवनवीन जिवाणू-विषाणूंची माहिती या प्रकल्पाअंतर्गत टाकल्यास त्याच्याशी जुळणाऱ्या व न जुळणाऱ्या जिवाणू-विषाणूबाबत जगाला कळू शकेल.