नागपूर : २३ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचे ५२वे सरन्यायाधीश भूषण गवई निवृत्त होतील. त्यांच्या जागी न्यायमूर्ती सूर्यकांत सरन्यायाधीश होतील आणि ते फेब्रुवारी २०२७ पर्यंत सुमारे १ वर्ष २ महिने पदावर राहतील. परंपरेनुसार, निवृत्त होणारे सरन्यायाधीश आपल्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस करतात. आतापर्यंत फक्त दोन वेळा ही “ज्येष्ठतेची परंपरा” मोडण्यात आली आहे.
स्वतंत्र भारताच्य इतिहासात सर्वोच्च न्यायालयाने १९५० पासून कार्य सुरू केल्यापासून आतापर्यंत अतिशय कमी प्रमाणात महाराष्ट्रातून न्यायमूर्ती सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचले आहेत. आताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातून येतात. यापूर्वी सोलापूरमधून येणारे यू.यू.लळित यांनी सरन्यायाधीश म्हणून काम बघितले होते.
माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे देखील महाराष्ट्राशी घनिष्ठ संबंध होते. शरद बोबडे यांनीही २०१९ ते २०२१ दरम्यान सरन्यायाधीश पदाची जबाबदारी स्वीकारली. आता महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई निवृत्त होत असताना पुढे कधी महाराष्ट्राचे सुपुत्र या पदापर्यंत पोहोचतील याकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातून पुढचा सरन्यायाधीश कोण?
न्यायमूर्ती सूर्यकांत हे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी ५३ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. ते पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयातून आले आहेत. त्यानंतर ५४ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती विक्रम नाथ फेब्रुवारी २०२७ मध्ये सरन्यायाधीश होतील आणि सप्टेंबर २०२७ मध्ये निवृत्त होतील. ते अलाहाबाद उच्च न्यायालयातून आले असून गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते.
न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथ्ना या भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश ठरणार असून त्यांचा कार्यकाळ फक्त ३६ दिवसांचा असेल (सप्टेंबर–ऑक्टोबर २०२७). त्यांनी नोटाबंदी प्रकरणात सरकारविरोधी अल्पमत मत दिले होते. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह (५६) ऑक्टोबर २०२७ ते मे २०२८ या काळात सरन्यायाधीश राहतील.
ते थेट बारमधून नियुक्त झालेले तिसरे न्यायमूर्ती आहेत. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला (५७) मे २०२८ ते ऑगस्ट २०३० या काळात सर्वात जास्त म्हणजे सुमारे दोन वर्षे सरन्यायाधीश राहतील. न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन (५८) मे २०३० ते मे २०३१ या काळात दहा महिन्यांसाठी सरन्यायाधीश राहतील. ते बारमधून आलेले चौथे सरन्यायाधीश असतील. न्यायमूर्ती जॉयमल्या बागची (५९) मे २०३१ ते ऑक्टोबर २०३१ या चार महिन्यांसाठी सरन्यायाधीश राहतील.
ते कलकत्ता उच्च न्यायालयातून आलेले आहेत. शेवटी, न्यायमूर्ती विपुल पंचोली (६०) मे २०३१ नंतर सरन्यायाधीश होतील आणि मे २०३३ मध्ये निवृत्त होतील. त्यांचा कार्यकाळ सुमारे दीड वर्षांचा असेल. ही यादी सेवा ज्येष्ठतेनुसार आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील तीन न्यायमूर्ती कार्यरत आहेत. यात न्या.प्रसन्ना वराळे आणि न्या.अतुल चांदूरकर यांचा समावेश आहे. न्या.जे.बी.पारडीवाला यांचा जन्म मुंबईचा आहे मात्र पारसी कुटुंबातून येणाऱ्या पारडीवाला यांचे बालपण, शिक्षण आणि बहुतांश काळ हा गुजरातमधील आहे. त्यामुळे त्यांच्या महाराष्ट्रातील जन्म असला तरी त्यांना थेट महाराष्ट्रीयन म्हणणे योग्य होणार आहे. यामुळे पुढील आठ वर्षात म्हणजेच २०३३ पर्यंत महाराष्ट्रातून कुणीही सरन्यायाधीश होणार आहे, असे म्हणता येईल.
