यवतमाळ : संपूर्ण पोलीस यंत्रणा ज्यांच्या इशाऱ्यावर चालते ते राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोमवारी यवतमाळात आले असता, चक्क पोलीस ठाण्यात पोहोचले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पोलीस ठाण्याच्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी चक्क पोलीस ठाणे गाठण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्री आज पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती समारंभाकरीता यवतमाळात आले होते. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांनी शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्यात भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.

पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी रोपटे देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले व पोलीस ठाण्याची माहिती दिली. यावेळी पोलीस प्रशासनातर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २७ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले. वीर शहीद जवान पत्नी सुनिता प्रकाश विहीरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जमिनीचा पट्टा वाटप करण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्यातील बालगुन्हेगारी, व्यसनाधीनता, अल्पवयीन मुलांमुलींचे हरवल्याचे अधिक प्रमाण यावर उपाययोजना करण्याच्या हेतुने पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून ‘ऑपरेशन प्रस्थान’ या अभिनव उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. याबद्दल यावेळी माहिती देण्यात आली. ‘ऑपरेशन प्रस्थान’ उपक्रमाचा पहिला टप्पा २१ एप्रील ते २९ मे या कालावधीत एक हजार ८०० मुलींना निवासी शिबीरामध्ये कराटे प्रशिक्षणासह कायदे विषयक, आरोग्य विषयक, कार्यशाळा तसेच करीअर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. ‘ऑपरेशन प्रस्थान’ उपक्रमाचा दुसरा टप्पा ७ जुलैपासून सुरु करण्यात आला. त्यामध्ये एकूण ३० हजार युवक युवतींना प्रशिक्षित करणे हा प्रमुख उद्देश आहे. आतापर्यत एकुण ११ शाळांमध्ये तीन हजार ८०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. ऑपरेशन प्रस्थानच्या दोन भागामध्ये पाच हजार ७०० युवतींना कराटे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच ‘ऑपरेशन प्रस्थान’ अंतर्गत तिसरा टप्पा दुर्गम भागातील आदिवासी आश्रम शाळा व उपविभागातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली. ‘ऑपरेशन प्रस्थान’ ही मोहीम संपूर्ण भारतभर राबविण्यात यावी, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत गणेश उत्सव, दुर्गा उत्सव, पूर नियत्रंण, वाहतूक नियमन इत्यादींसाठी युवक, युवतींनी पोलीसांसोबत राहून कामकाज केले. यावेळी युवतींनी मुख्यमंत्र्यांसमोर कराटेचे प्रात्यक्षिकही सादर केले.

याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, माजी मंत्री मदन येरावार, आमदार राजू तोडसाम, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, माजी खासदार रामदास तडस आदी उपस्थित होते.