यवतमाळ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अवघ्या दोन महिन्यांत सुरू करून राज्य सरकारने ऐतिहासिक काम केले. राज्यातील दीड कोटी भगिनींना योजनेचा लाभ मिळाला तरीही विरोधक ही योजना आम्ही मतांसाठी सुरू केल्याची टीका करत आहेत. मात्र महायुती सरकारने लाडकी बहीण योजना मत मागण्यासाठी नव्हे तर महिलांची घरातील, समाजातील पत वाढविण्यासाठी सुरू केली आहे, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

यवतमाळ येथे शनिवारी आयोजित मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह महायुतीचे अमरावती विभागातील सर्व आमदार उपस्थित होते.

हेही वाचा…मुख्यमंत्र्यांनी ‘खात्यात पैसे आले का’ विचारताच महिलांचा गोंधळ…अखेर भाषण थांबवून….

मुख्यमंत्र्यांनी सर्व महिलांना पैसे खात्यात आले की नाही, हे हात उंचावून सांगण्याचे आवाहन केले तेव्हा संपूर्ण सभागृहातील महिलांना हात उंचावून समर्थन दिले. ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होईल आणि सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे जमा होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्य सरकारने लाडक्या शेतकऱ्यांना वीज माफी, लाडक्या भावांसाठी युवा कार्यक्रम जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील माता, भगिनी सरकारच्या बाजूने उभ्या राहणार या भीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते या योजनेबाबत भ्रम निर्माण करत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. योजनेतच खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा, असे आवाहन त्यांनी केले. आमच्या पाठीशी स्त्रीशक्ती असल्याने आम्हाला कोणाची भीती नाही, असे ते म्हणाले.

बदलापूरच्या घटनेवर विरोधक राजकारण करत असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतरही आंदोलन कार्यकर्ते बदलून आठ ते दहा तास कोणी सुरू ठेवले. विरोधकांना महाराष्ट्र पेटवायचा आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्यांनी २०१९ मध्ये जनाधाराचा विश्वासघात केला. तेव्हा तोंड उघडले असते तर आज तोंडावर काळी पट्टी बांधायची वेळ आली नसती, असे ते म्हणाले. ‘एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग’ या गाण्याच्या ओळी सांगून महाविकास आघाडीलाही तुमचा चेहरा नकोसा झाला. तुम्हाला आता जनता कशी स्वीकारेल अशी टीका केली. महायुतीचे सरकार विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा…रा. स्व. संघाशी संबंधित कंत्राटी कामगार संघटनेचा नागपुरात ठिय्या….मागण्या पूर्ण होईस्तोवर….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास लाडकी बहीण ही योजना पाहिले बंद करतील. त्यामुळे भगिनींनी महायुतीच्या पाठीशी राहावे. ही योजना कधीच बंद होणार नाही, अशी ग्वाही दिली. बदलापूर प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई सुरू झाली आहे. आता प्रत्येक शाळेची सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.