scorecardresearch

महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही! मुख्यमंत्र्यांचा आरोप; अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी पत्रकार परिषद

विरोधी पक्षाने अध्यक्षांवर भेदभाव केल्याचा आणि विरोधी पक्षाला बोलू न दिल्याचा आरोप केला.

महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही! मुख्यमंत्र्यांचा आरोप; अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी पत्रकार परिषद
एकनाथ शिंदे

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास विकास आघाडीत सावळा गोंधळ होता, त्यांच्याच एकवाक्यता नव्हती, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

विरोधी पक्षाने अध्यक्षांवर भेदभाव केल्याचा आणि विरोधी पक्षाला बोलू न दिल्याचा आरोप केला. विरोधी पक्षातील काही सदस्यांनी तर विधानसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वासाचे पत्र विधिमंडळ सचिवांना दिले. परंतु नवीन नियमानुसार अध्यक्षाविरुद्ध एक वर्षांपर्यंत अविश्वास आणता येत नाही. तसेच या पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वाक्षरी केली नाही, अशी विचारणा केली असता मुख्यमंत्री म्हणाले, आजवर अशाप्रकारे खालच्या पातळीवर आरोप झाले नव्हते. ही अतिशय निंदनीय बाब आहे. शिवाय त्यांनी अविश्वासाबाबत आधी नियमांची माहिती करून घ्यायला हवी होती. पवार यांनी त्या पत्रावर स्वाक्षरी न करणे हे त्यांच्यात एकवाक्यता नसल्याचे द्योतक आहे.

आमच्या सरकारचे पहिलेच अधिवेशन विदर्भात होते. विदर्भाला भरभरून देण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधी पक्षाने आमची बदनामी केली. त्यासाठी ते सभागृहाबाहेर घोषणा देत होते तसेच सभागृहात कमी आणि सभागृहाबाहेर अधिक चर्चा करीत होते, असेही शिंदे म्हणाले.

लोकशाहीच्या गप्पा मारणारे ४६ मिनिटेच सभागृहात- फडणवीस 

उठसूठ लोकशाहीच्या गप्पा मारणारे सभागृहात केवळ ४६ मिनिटे उपस्थित होते, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. ते आज अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेना (ठाकरे गट) एका ३२ वर्षीय युवकाला सरकार घाबरले, अशी टीका करते याबाबत विचारले असता, फडणवीस म्हणाले, त्यांच्या पूज्य पिताश्री यांना आम्ही घाबरलो नाही. त्यांच्या नाकाखालून सरकार घेऊन गेलो. तर त्यांना काय घाबरणार!

साडेआठ तास वाया; १२ विधेयके मंजूर

दोन आठवडे चाललेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. अधिवेशनादरम्यान एकूण ८४ तास १० मिनिटे काम झाले. विविध कारणांमुळे ८ तास ३१ मिनिटे वाया गेली. या अधिवेशनात दोन्ही सभागृहात १२ मंजूर विधेयके मंजूर करण्यात आली. विधान परिषदेत तीन विधेयके प्रलंबित आहेत. ३६ तारांकित प्रश्नांवर उत्तर देण्यात आले. एकूण ४२२ प्रश्न स्वीकृत झाले होते. यावेळी १०६ लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. सदस्यांची एकूण सरासरी उपस्थिती ७९.८३ टक्के होती, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 02:57 IST

संबंधित बातम्या