बुलढाणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एरवी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींसमवेत मनमोकळेपणाने बोलतात, आक्रमकपणे व्यक्त होतात. मात्र आज बुधवार, ६ ऑगस्टला दुपारी ते बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) मध्ये आले असता त्यांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधीना मुकपणे हात जोडले आणि पुढे निघून गेले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या कृतीला कारणही तसेच होते. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघांचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मातोश्री उर्मिला श्रीराम कुटे यांचे नुकतेच निधन झाले. यानिमित्त आमदार संजय कुटे व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव येथे आले. त्यांच्या समवेत भाजप नेते, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील आले होते. आज दुपारी तीन वाजताच्या दरम्यान ते जळगाव जामोद येथे दाखल झाले. हेलिपॅडवरून आपल्या ताफ्यासह ते आमदार डॉ. संजय कुटे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर हे सुद्धा हजर होते. कुटे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर ते जळगावकडे रवाना झाले. पत्रकारांशी बोलण्यास त्यांनी विनम्र नकार दिला.

जळगाव आगमन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव जामोद येथे आगमन झाले. यावेळी कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, अमरावती विभागीय उपायुक्त अजय लहाने, अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक रामनाथ पोकले, उपजिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रभारी पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उप विभागीय अधिकारी राजेंद्र काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर सुधीर पाटील आदी उपस्थित होते.