मुख्यमंत्री महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार
उन्हाळ्याच्या दीड महिन्यांच्या सुटीनंतर विदर्भात आणि नागपुरात सोमवारी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करावे, असे आदेश जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिले.
शाळा सुरू होण्याऱ्या शहरातील जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांची रंगगंगोटी करण्यात आली आहे. जवळपास सर्वच शाळा सज्ज असून शाळेतील पिण्याची पाण्याची व्यवस्था, शौचालये, टेबल आदी साहित्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती राहावी, यासाठी शिक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षकांनी अनुपस्थित राहू नये आणि राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश संबंधित जिल्ह्य़ाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. शिक्षण विभागाचे अधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्य जिल्ह्य़ातील आणि शहरातील शाळांना भेटी देणार आहेत. प्रत्येक प्रभागाच्या नगरसेवकांनी आपल्या परिसरातील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करावे, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा सोमवारपासून सुरू होणार असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या मतदारसंघातील विवेकानंद हिंदी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहे. महापौर प्रवीण दटके संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेतील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, जयताळा मराठी माध्यमिक शाळा साने गुरुजी उर्दू माध्यमिक शाळा पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळा दुर्गानगर मराठी माध्यामिक शाळेत विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.