नागपूर : राज्यात मोसमी पावसाने मुक्काम लांबवला आणि त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यंदा थंडी अनुभवायला मिळणार की नाही, असाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. यंदाच्या वर्षी पाऊस नवीन वर्षाचे स्वागत करूनच माघारी फिरणार आहे का? असे मिम्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. अशातच आता हवामान विभागाकडून पाऊस आणि थंडीसंदर्भात मोठी माहिती देण्यात आली आहे.
येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात थंडीची लाट येणार आहे, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर, बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यामुळे पुढील काही दिवस आता दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. काही राज्यात पावसाचा इशारा तर काही राज्यांमध्ये थेट थंडीच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. वातावरणात सातत्याने बदल होत आहे.
महाराष्ट्रात सध्या गुलाबी थंडीचे आगमन झाले असले तरी राज्यात किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने गारठा जाणवू लागला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका, जळगाव जिल्हा आणि जेऊरमध्ये दहा अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक कमी ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. तर भंडारा येथे दहा अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले.
नागपूर आणि यवतमाळ शहरात १०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. दिल्ली,पंजाब, राजस्थानसह बहुतेक राज्यांत रात्रीचे तापमान ५ ते ९ अंशांपर्यंत उतरले आहे. या उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रासह गुजरातच्या काही भागांतही पारा उतरला असून, उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. तापमान तब्बल ९ अंश सेल्सिअस नोंदवल्याने सकाळी नागरिकांना हुडहुडी भरत आहे. थंडीच्या या वाढत्या लाटेतही मॉर्निंग वॉकला नागरिकांची विशेष पसंती दिसून येत आहे. रात्रीच नाही तर दिवसासुद्धा हवेत गारठा आहे. ऊबदार कपडे, मफलर आणि जाकेट घालून अनेक जण सकाळी फेरफटका मारत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
या राज्यात पाऊस..
केरळमध्ये पुढील काही दिवसांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १६ ते २० नोव्हेंबर दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळ, विजांचा कडकडाट यासोबतच पुराचा धोका देखील असणार आहे. उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. राज्यातील तीन ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. पुढील काही तास केरळसाठी अत्यंत धोकादायक आहेत.
