अकोला : वडिलांच्या निधनानंतर कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळतो. कुटुंबाचा आधार हरपल्यानंतर जबाबदारी निश्चितच मुलांवरच येते. अनुकंपा तत्वावर नोकरी लागणार या आशेवर असतांना वर्षानुवर्षे शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. वाशीम जिल्ह्यात याच प्रकारे दोन उमेदवारांना दहा वर्षांच्या संघर्षानंतर नोकरीची वाट गवसली.
वाशीम जिल्ह्यात वनविभागात कार्यरत असलेले सुधाकर कांबळे यांचे सन २०१५ मध्ये निधन झाले. घरातील कर्ता पुरुष गेल्याचे दु:ख तरच होतेच, शिवाय आता पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला. घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची. मर्यादित उत्पन्न आणि अडचणींनी भरलेले दिवस सुरू झाले.
आईने घरातील सर्व जबाबदाऱ्या खंबीरपणे सांभाळत, मुलांचं संगोपन आणि शिक्षण या दोन्ही आघाड्यांवर प्रयत्न सुरू ठेवले. वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा नियुक्तीच्या प्रतीक्षा यादीत तब्बल १० वर्षे किरण कांबळे यांचे नाव राहिले. दरवर्षी अपेक्षा निर्माण व्हायची, निकाल मात्र काही लागेना. काळ जसजसा पुढे गेला, तसतशी सरकारी नोकरीची आशा मावळू लागली. बी.ए. पदवी प्राप्त केलेल्या किरण कांबळे यांच्या मनातही हळूहळू निराशेचे सावट दाटू लागले.
आता नोकरी लागणार नाही, अशीच भावना तयार झाली. अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणार की नाही? अशी परिस्थिती असतानाच किरण कांबळे यांच्या आयुष्यात पुन्हा आशेचा ‘किरण’ उजळला. त्यांची वडिलांच्या जागेवर ग्राम महसूल अधिकारी म्हणून नियुक्ती निश्चित झाली आणि त्या क्षणी कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. आज किरण कांबळे महसूल विभागात जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करतात. दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेलं हे यश त्यांच्या जिद्दी, संयम आणि चिकाटीचे प्रतीक ठरले आहे.
याच प्रकारे सन २०१५ मध्ये मनिषा कड यांच्या वडिलांचे शासकीय सेवेत कार्यरत असताना निधन झाले. कुटुंबावर संकट कोसळले. अचानक आधार गमावल्याने संपूर्ण घर हादरले. कौटुंबिक परिस्थिती अवघड, उदरनिर्वाहाची चिंता आणि जबाबदाऱ्यांचा भार कुटुंबावर आला. अनुकंपा नियुक्तीची प्रतीक्षा असतांना एक-एक दिवस सरत गेले, वर्षं उलटत गेली. मनिषा तब्बल दहा वर्षे प्रतीक्षा यादीतच राहिल्या. प्रत्येक वर्षी नियुक्तीची आशा क्षणभर डोकवायची आणि पुन्हा मावळायची. त्यानंतर अनुकंपा नियुक्तीच्या धोरणामुळे मनिषा मोहन कड यांची अखेर भूजल सर्वेक्षण विभागात नियुक्ती मिळाली. दहा वर्षांचा संघर्ष, संयम आणि श्रद्धेचे फळ अखेर त्यांना मिळाले.