नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी ज्यांच्या आधारे मतचोरीचा आरोप करीत होते त्या ‘सीएसडीएस’चे (सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी) प्रमुख संजय कुमार यांच्या विरोधात रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार तक्रार दाखल करण्यात आली आहे. रामटेक तहसीलदारांनी ही तक्रार केल्याच्या वृत्ताला जिल्हा निवडणूक शाखेकडून दुजोरा देण्यात आला.
‘सीएसडीएस’ने महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा समाज माध्यमांवर केला होता. त्यात रामटेकचे उदाहरणही दिले होते. तसेच मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कमी करण्यात आल्याचा दावा केला होता.
मात्र, ‘सीएसडीएस’ तो दावा खोटा असून नागरिक आणि मतदारांची दिशाभूल करणारा आहे, अशा आशयाची तक्रार रामटेकच्या तहसीलदारांनी पोलिसांकडे दिली. त्यासंदर्भात रामटेक पोलिसांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
‘सीएसडीएस’च्या आकडेवारीचा आधार घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात मतांचा घोळ झाल्याचा खळबळजनक आरोप केला होता, हे येथे उल्लेखनीय.