लोकसत्ता टीम

वर्धा : हिंदी विद्यापिठातील आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. विविध कारणांनी नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापिठात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.

२६ जानेवारीच्या कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांवर अशांती निर्माण केल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई बेकायदेशीर असून निलंबनाचे कारण पण दिले नसल्याचा आरोप करीत विवेक मिश्र या विद्यार्थ्याने सत्याग्रह आंदोलन सुरू केले. न्याय न मिळाल्याचे स्पष्ट करीत या विद्यार्थ्याचे आमरण आंदोलन सुरू केले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. या विद्यार्थ्यासोबतच आंदोलन करणाऱ्या जतीन चौधरी यालाही बडतर्फ करण्यात आले आहे. ही कारवाई झाल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी गुरूवारी रात्रीच प्रशासनास जाब विचारण्याचे ठरविले. मात्र, त्यांना रस्त्यातच सुरक्षारक्षकांनी अडवून मारहाण केली. त्यात दिनेश, आदित्य, स्वराज हे विद्यार्थी जखमी झाले. या कारवाई विरोधात रामनगर पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-“उत्तर नागपुरातील उड्डाण पूल बांधकामाचे चुकीचे नियोजन,” नॉर्थ नागपूर सिनियर सिटीझन फोरमचा आक्षेप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिपक यादव याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची तक्रार पोलीसांकडे केली आहे. तर उपचार घेणाऱ्या विवेक मिश्र या विद्यार्थ्याने एका पत्रातून आपल्या चिंताजनक स्थितीस कुलगुरू व कुलसचिव जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.