नागपूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी टि्वट करत महाराजांना श्रद्धांजली वाहिली. त्यावर भाजपचे नेत्यांनी आक्षेप घेत आहेत. राहुल गांधी यांची ते  ट्विट काढून घ्यावे आणि माफी मागावी, अशी मागणी भाजप करत आहे. त्याला प्रतिउत्तर देत काँग्रेसने राहुल गांधींच्या ट्विटवर बोलण्याआधी भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट नीट पहावे, असा सल्ला दिला आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपाचे नेते जो आकांडतांडव करत आहेत, त्याआधी त्यांनी त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट नीट पहावे आणि नंतर बोलावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर कोणी केला असेल तर भाजपानेच वारंवार केला असून त्यांनीच माफी मागावी, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवजयंती निमित्त ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त केलेल्या ट्विटमध्येही नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली असेच लिहिलेले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या ट्विटवरून भाजपा नेत्यांनी राजकारण करू नये. मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. भाजपाच्या सरकारनेच हा पुतळा उभारला आणि अवघ्या आठ महिन्यात तो कोसळला आणि महाराजांचा अवमान केला, कोट्यवधी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरबी समुद्रात छत्रपतींचे भव्य स्मारक उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जलपुजनही करण्यात आले पण अद्याप या स्मारकाची एक विटही रचलेली नाही, त्याबद्दल भाजपा माफी कधी मागणार, असा प्रश्न अतुल लोंढे यांनी विचारला आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अवमान केला. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही महाराजांचा अपमान केला पण त्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना जराही लाज वाटत नाही, माफी मागत नाहीत आणि राजकीय स्वार्थासाठी महाराजांचा वापर करतात अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो असेही अतुल लोंढे म्हणाले.