चंद्रपूर : काँग्रेसने माजी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवली आहे, तर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे आहेत आणि आता महिला जिल्हाध्यक्षपद ॲड. कुंदा जेणेकर यांच्याकडे सोपवले आहे. हे तिन्ही नेते राजुरा या एकाच तालुक्यातील आणि कुणबी जातीचे प्रतिनिधित्व करीत असल्याने काँग्रेसमध्ये सक्रिय दलित, आदिवासी तथा ओबीसीतील अन्य जातींमध्ये तीव्र नाराजी आहे. दुसरीकडे, ॲड. जेणेकर यांंच्या नियुक्तीमुळे धोटे नाराज असल्याचे बोलले जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेसचा कस लागणार आहे. या निवडणुका संघटनात्मक शक्तीच्या बळावर जिंकल्या जातात. मात्र, सध्या संघटनात्मक पातळीवर काँग्रेस पक्ष कमकुवत झाला आहे. संघटनेकडे नेत्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. याला कारण मागील काही वर्षांत संघटनात्मक पातळीवर झालेल्या नेमणुकांचे दिले जाते.
राजुरा या एकाच मतदारसंघात संघटनेतील तीन महत्त्वाची पदे देण्यात आली. त्यातही जिल्हा काँग्रेस व युवक काँग्रेस ही दोन्ही पदे धोटे या एकाच कुटुंबाकडे आहेत. ७५ वर्षे वय असल्याने सुभाष धोटे यांना पायाला भिंगरी लागल्यागत फिरणे शक्य नाही. तरीही त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. युवक काँग्रेस अध्यक्ष शंतनू विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करताना दिसले नाहीत. मग ते युवकांना काँग्रेसकडे कसे आकर्षित करू शकतील, हा प्रश्नच आहे. आता याच राजुरा तालुक्यातील ॲड. जेणेकर यांच्याकडे काँग्रेसने महिला जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. या पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा मागील अनेक वर्षांपासून होती. मात्र, सुभाष धोटे यांच्या विरोधामुळे त्यांचे नाव आजवर मागे पडत गेले. आता काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी धोटे यांचा विरोध झुगारून ॲड. जेणेकर यांची या पदी नियुक्ती केली. एकप्रकारे धानोरकर यांनी धोटे यांना शहच दिला. जिल्हा उपाध्यक्षपदी एहतेशाम अली यांची नियुक्ती करून काँग्रेसने मुस्लीम समाजाला जवळ केले.
कुणबी व मुस्लीम समाजाला प्राधान्य
एकंदरीत, कुणबी व मुस्लीम समाजाला नियुक्त्यांमध्ये प्राधान्य देताना काँग्रेसने दलित, आदिवासी तसेच ओबीसी समाजातील इतर घटकांना डावलले. यामुळे हे सर्व समाज नाराज आहेत. विशेषत: दलित समाजातील नेते तीव्र नाराज आहेत. काँग्रेसच्या मंचावर दलित समाजाच्या प्रतिनिधीला स्थान मिळत नाही, आता संघटनेत पदही दिले नाही, अशी ओरड दलित समाजाच्या नेत्यांमधून होत आहे.
