जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज, शनिवारी निवडणूक झाली. राजुरा, पोंभूर्णा व सिंदेवाही या तीन बाजार समितीत काँग्रेस तर नागभीड व गोंडपिंपरी या दोन ठिकाणी भाजप आणि भद्रावतीत ठाकरे गटाचे सभापती व उपसभापती विजयी झाले. राजुरा येथे उपसभापतीपदावरून भाजपमध्ये उफाळून आलेल्या अंतर्गत कलहामुळे दोन माजी आमदारांना उमेदवाराच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला. जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांपैकी सहा बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक शुक्रवारी झाली तर उर्वरित सहा बाजार समितीची निवडणूक शनिवारी पार पडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> बुलढाणा : ‘त्या’ सहा वर्षीय बालिकेचा अखेर मृतदेहच आढळला; दगडाने ठेचून हत्या, समाजमन सुन्न

राजुरा बाजार समितीत आमदार सुभाष धोटे समर्थक विकास देवाळकर यांची सभापतीपदी अविरोध वर्णी लागली, तर उपसभापतीपद काँग्रेस आमदार धोटे यांनी स्थानिक नेत्यांना युती करताना शब्द दिल्याने भाजपला द्यावे लागले. उपसभापती पदासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे भाचे संजय पावडे व सतीश कुमरवल्लीवार या दोघांनी भाजपकडून उमेदवारी दाखल केली. एकाच पदासाठी भाजपकडून दोन जण इच्छुक असल्याने व दोघेही नामांकन परत घेण्यास तयार नसल्याने वादावादी झाली. मतदानाला सुरुवात होणार तोच कुमरवलीवार यांनी उमेदवारी मागे घेत पावडे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर माजी आमदार सुदर्शन निमकर व ॲड. संजय धोटे यांच्यावरही रोष व्यक्त केला. त्यामुळे येथे चांगलीच शाब्दीक चकमक उडाली होती. काँग्रेस नेत्यांनी बाजार समिती सदस्यांच्या मनातील सभापती न दिल्याने आमदार धोटे यांच्या घराकडेही सदस्य फिरकले नाही.

हेही वाचा >>> यवतमाळात तिघांचा तलावात बुडून मृत्यू; दोन महाविद्यालयीन तरुण व एका शाळकरी विद्यार्थ्याचा समावेश

सिंदेवाही बाजार समितीत माजी मंत्री विजय वडेट्टीवार समर्थक रमाकांत लोधे सभापती तर दादाजी चौके उपसभापती झाले. पोंभूर्णा येथे कॉग्रेसचे रवी मारपल्लीवार सभापती तर आशीष कावटवार उपसभापतीपदी निवडून आले. गोंडपिंपरी बाजार समितीत सभापतीपदी भाजपचे इंद्रपाल धुडसे तर उपसभापतीपदी स्वनील अनमूलवार, नागभीड बाजार समितीत भाजपचे अवेश पठाण सभापती तर रमेश बोरकर उपसभापतीपदी, भद्रावती बाजार समितीत ठाकरे गटाचे उद्धव लटारी ताजने सभापती तर अश्लेशा शरद जीवतोडे उपसभापतीपदी निवडून आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress chairman on three market committees bjp won in two thackeray group won in bhadravati rsj 74 zws
First published on: 13-05-2023 at 20:51 IST