Solar Explosives Company Explosion Nagpur : नागपूर : भारतीय जनता पक्ष ‘व्होट चोरी आणि त्या आडून नोट चोरी’ करत आहे. कामठी येथील आमदाराने तर चमत्कार केला आहे. त्यांचे इंदूर कनेक्शन आहे. भाजप नेते विजय वर्गीया यांच्या माध्यमातून सहा वर्षांत १२०० कोटींची उलाढाल केली आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे बुधवारी नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघातून राज्यस्तरीय ‘व्होट चोर गद्दी छोड’ आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी सपकाळ बोलत होते. कामठीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आयोजित सभेला रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे, भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री यशोमती ठाकूर, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल गुडधे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मतचोरीबद्दल बोलताना सपकाळ म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीनंतर मतचोरीचा प्रकार सर्वप्रथम कामठी विधानसभा मतदारसंघात उघडकीस आली. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष असताना कामठी मतदारसंघात गावागावत मतचोरी केली. या मतदारसंघात एकाच खोलीतून पाच-पाचशे मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली. भाजपला मतचोरी करण्याचा मार्ग कामठीच्या आमदाराने दाखवला. एका एका भ्रमणध्वनीवरून ५०० मतदारांची नोंदणी केली. त्यामुळे पहिला बंदोबस्त कामठीच्या आमदाराचा करायचा असल्याचे सांगत सपकाळांनी बावनकुळेंना लक्ष्य केले.

कामठी येथील आमदार यांचे इंदूर कनेक्शन आहे. त्या कनेक्शनच्या माध्यमातून आणि विजय वर्गीयाच्या माध्यमातून सहा वर्षांत १२०० कोटींची उलाढाल झाली आहे. मत चोरी नंतर हा त्यांचा दुसरा चत्मकार आहे. हरामाच्या पैशाने देशातील नागरिकांना विकत घ्यायचे, मतदारांना विकत घ्यायचे असे त्यांचे नियोजन आहे. अशाप्रकारे लोकांचा स्वाभिमान विकत घेण्याचे राजकारण भाजपचे सुरू आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

प्रतिभा धानोरकर यांनी गावागावात मतचोरीचा मुद्दा पोहचवा, असे आवाहन केले. यशोमती ठाकूर यांनी अमरावती लोकसभा मतदार संघात मतदारांची संख्या कमी करून जिल्हाधिकाऱ्यांनी विक्रम नोंदवला आहे. आता आपल्याला कार्यकर्ते प्रशिक्षित करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. नामदेव किरसन यांनी मतदार यादी तपासण्याचे तंत्र शिकून मताचा अधिकार वाचवण्याचे आवाहन केले.