काँग्रेसचा १३९ वर्धापन दिन नागपूर येथे साजरा करण्यात आला. पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त देशभरातील काँग्रेस नेते नागपूरात दाखल झाले होते. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी या सोहळ्याला हजर राहू शकल्या नाहीत. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आपल्या भाषणात म्हणाले, “नागपूरमध्ये एका बाजूला दिक्षाभूमवीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आहे. तर याच नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जन्मस्थळही आहे. पंतप्रधान मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झेंडा घेऊन पुढे जात आहेत. संघ या देशाचे वाटोळे करू पाहत आहे. संघाचे विचार जपणाऱ्या भाजपा सरकारला जर आपण रोखू शकलो नाही तर देशातील लोकशाही उध्वस्त होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधान निकामी होईल.”

हे वाचा >> “…तेव्हापासून नरेंद्र मोदींचं भाषण बदललं”, राहुल गांधींचा टोला; म्हणाले, “आधी ते स्वत:ला…!”

मराठीत बोलताना खरगे म्हणाले…

“मी जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारधारेवर चालतो. पंतप्रधान मोदीजी संघाच्या विचारधारेवर चालत असून ते समानतेच्या विरोधात आहेत. आज ना उद्या ते पुन्हा एकदा दलितांना खाली खेचतील. आज शिष्यवृत्ती बंद आहे, वसतिगृह बंद आहेत. वंचित, उपेक्षित घटकातील मुलांना शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत. शिक्षण महत्त्वाचे आहे, म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा”, असा मूलमंत्र दिला. डॉ. आंबेडकरांचा हा विचार पुढे घेऊन जाणे, ही आपली जबाबदारी आहे”, असे खरगे यांनी सांगितले.

आणखी वाचा >> “महाराष्ट्रातील कार्यकर्ते माझ्यासाठी स्पेशल, कारण…”, राहुल गांधींनी सांगितलं काँग्रेस-महाराष्ट्राचं नातं!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा सरकारवर टीका करताना खरगे म्हणाले, “आज महागाई एवढी वाढली आहे की, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्याबद्दल मोदी सरकार काहीही प्रतिक्रिया देत नाही. बेरोजगारीबद्दल मोदी सरकार काही बोलत नाही. केंद्र सरकारमधील ३० लाख सरकारी नोकऱ्या रिक्त आहेत. त्या भरल्या जात नाहीत. त्या भरल्या तर देशातील उपेक्षित, वंचित घटकातील लोकांना नोकरी मिळेल. कुठेतरी रोजगार मेळावा घेऊन आठ-दहा हजार नोकऱ्या दिल्या जातात आणि त्याची मोठी जाहीरातबाजी केली जाते.”

“आज गरीब आणि श्रीमंतामध्ये खूप दरी निर्माण झाली आहे. आम्ही जेव्हा सरकारमधून बाहेर पडलो तेव्हा देशावर केवळ पाच लाख कोटीचे कर्ज होते. मात्र मोदींच्या काळात १० वर्षात हे कर्ज २०० लाख कोटींवर पोहोचले आहे”, अशीही टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.