नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे होत आहेत, शिशुपालाप्रमाणे आरएसएसचीही शंभरी भरली आहे आता त्यांनी ‘मनुस्मृती’ व ‘बंच ऑफ थॉट’ चे दहन करून रा. स्व. संघ विसर्जित करावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. संविधानाने सर्व जाती धर्माच्या लोकांना, महिलांना व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत सर्व क्षेत्राची दारे उघडी केली आहेत. पण भाजपाच्या राजवटीत संविधानाची पायमल्ली केली जात आहे.

गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत करण्याची व्यवस्था भाजपा केली असून त्याचे मुळ आरएसएस आहे. बहुजन समाजाचे फक्त शोषण सुरु आहे. मुठभर लोकांच्या हातात धर्मसत्ता व राजसत्ता असावी हे त्यांचे धोरण आहे. त्यांच्या या धोरणाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा आम्ही जाहीर निषेध व धिक्कार करतो, अशी टीकाही त्यांनी केली.

संविधान सत्याग्रह पदयात्रेचा बुधवारी वर्धा जिल्ह्यात प्रवेश झाला.

तिसऱ्या दिवशीची पदयात्रा खडकीपासून सुरू होऊन लालवानी, वर्धा येथे पोहचणार आहे. या यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्या २ ऑक्टोबर रोजी ही पदयात्रा सेवाग्राम आश्रमात दाखल होत आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु असलेल्या या पदयात्रेत माजी मंत्री राजेंद्र मुळक, काँग्रेस नेत्या चारुलता टोकस, शेखर शेंडे वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अनंत मोहोड, राजेंद्र तिडके, संदेश सिंघलकर, कवी ज्ञानेश वाकुडकर, कराळे गुरुजी, शैलेश अग्रवाल, फिरोज मिठीबोरवाला, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प.) यांच्यासह स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारताचे संविधान मान्य नाही, स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष संघाच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला नाही. मनुस्मृतीवर देश चालावा हा त्यांचा आग्रह आहे. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिले पण संघाने मात्र जाती धर्मात द्वेष वाढवला, त्यांनी विविधतेत एकता गुंडाळून ठेवली आहे. १०० वर्षात विषारी व विखारी विचार पेरला, माणसा-माणसात भेद केला, मंदिर प्रवेश नाकारला, स्त्री-पुरुष समानता नाकारली. संघाच्या विषारी झाडाच्या छायेत भ्रष्टाचार वाढला, बहुजन समाज नागवला गेला. आम्ही भारताचे सर्व जाती पंथाचे लोक रा. स्व. संघाच्या या १०० वर्षाच्या काळ्या कारकिर्दीचा धिक्कार करतो, निषेध करतो. १०० वर्ष पूर्ण करताना संघाने आता संविधान अंगिकारावे, महात्मा गांधींचा फोटो व संविधान संघ कार्यालयात ठेवावे तसेच रा. स्व. संघाची नोंदणी करावी, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले..