लोकसत्ता टीम
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस हे दोन्ही पक्ष स्वतंत्र विदर्भ राज्याचे विरोधक आहेत. त्यामुळे या पक्षांना आमचा विरोध आहे. स्थानिक पातळीवर राजुरा विधानसभा मतदार संघाचा विचार केला तर काँग्रेस हा पहिला तर भाजप दुसऱ्या क्रमांकाचा शत्रू आहे. लोकसभा निवडणुकीत जय विदर्भ पक्षाचे अशोक राठोड रिंगणात असून त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी दिली.
आणखी वाचा-“भाजपचा जाहीरनामा केवळ ‘जुमला’ आहे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
राजुरा व वरोरा या दोन विधानसभा मतदारसंघांत शेतकरी संघटनेचे प्राबल्य आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. चटप यांच्याशी चर्चा केली असता जय विदर्भ पक्षाचे उमेदवार अशोक राठोड यांचा प्रचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप व काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये लढत आहे. हे दोन्ही पक्ष स्वतंत्र विदर्भ राज्याचे विरोधक आहेत. स्थानिक पातळीवर विचार केला तर काँग्रेस हा आमचा पहिला शत्रू आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार धोटे यांनी ॲड. चटप यांचा अडीच हजार मतांनी पराभव केला. येथे काँग्रेस पक्षाशी लढायचे असल्याने हा प्रथम क्रमांकाचा शत्रू आहे, असे ते म्हणाले.