नागपूर : गेल्या अडीच वर्षांपासून मोदी-शाह यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत बहुमत मिळूनही सत्तेतील सर्वोच पद मिळत नसेल तर तर त्यांचा चेहरा पडणे साहजिकच आहे. एवढेच नव्हेतर यापुढेही शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादीची (अजित पवार) उपयुक्तता संपलेली असेल, अशी खोचक टीका माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
नवीन सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री बनवले जाण्याचे वृत्त आहे. पण, हे दोघेही मोदी आणि शाह यांच्या आशीर्वादाशिवाय सत्तेत राहू शकत नाहीत. त्यांना सत्तेत सहभागी करून पदे दिली किंवा पदे नाही दिली, तरी ते काहीही करू शकत नाही. त्यांना गुपचूप बसण्यापलिकडे काहीही करता येणे शक्य नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा : ‘त्या’ गिधाडांना झाले तरी काय? एकापाठोपाठ एक…
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद दिले जाणार असल्याचे समजते. ही आनंदाची गोष्ट आहे. विदर्भाच्या पुत्राला पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळत आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत. मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर ते विदर्भातील अनुशेष भरून काढतील, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी त्यांना ते शक्य झाले नव्हते. आता त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यांना कुबड्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ‘फ्री हँड’ काम करावे आणि विदर्भातील अनुशेष दूर करावा. येथील बरोजगारांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे. त्यांच्यावर सुडाचा राजकारण करण्याचा आरोप आहे. हा आरोप पुसून काढण्याची त्यांना संधी आहे. राजकीय लढाई विचारधारेची असली पाहिजे, वैयक्तिक शत्रुत्वाची लढाई नसावी. त्यांच्याबाबत राज्यात जो गैरसमज निर्माण झाला आहे. तो यावेळी पुसून निघेल. अशी अपेक्षा आहे, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला.