अमरावती : श्री शिवप्रतिष्ठान हिदुस्‍थान संघटनेचे संस्‍थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या अवमानजनक वक्तव्यावरून कॉंग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भिडे यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने सोमवारी दुपारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्‍यात आली. पोलिसांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांना अटक केली. या आंदोलनादरम्यान भीम ब्रिगेडच्‍या कार्यकर्त्‍यांनी संभाजी भिडे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे गोंधळ उडाला होता.

काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी काँग्रेसच्या नेत्यांना अटक करून पोलीस वाहनात बसवले. त्‍याचवेळी भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचले. संभाजी भिडे यांच्‍या पुतळ्याचे दहन करण्‍याचा त्‍यांचा प्रयत्‍न होता, पण पोलिसांनी पुतळा जप्त करताच भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची गाडी अडवली. आमचा पुतळा परत करा अशी मागणी त्‍यांनी केली. पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली. त्यामुळे आंदोलन स्थळी चांगलाच गोंधळ उडाला. पोलिसांनी भीम ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर बळाचा वापर करून त्‍यांना गाडीत कोंबले. यावेळी भीम ब्रिगेड कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्‍या विरोधात घोषणाबाजी केली.

हेही वाचा – डोळे येऊ नये म्हणून घरातच करा हा साधा उपाय, काय आहे आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला?

हेही वाचा – घरो-घरी घसा खवखवण्याचा त्रास! ‘हे’ घरगुती उपाय फायद्याचे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार यशोमती ठाकूर, माजी राज्‍यमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच नेत्यांना पोलिसांनी अटक केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दंगा नियंत्रण पथक, जलद गती कृती पथक तैनात होते. भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यावर पोलिसांनी बळाचा वापर केला. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात समोरील चौकात वाहतुकीची कोंडी झाली होती. सर्व आंदोलकांना अटक केल्यावर पोलिसांनी मार्ग मोकळा केला.