नागपूर : केंद्रीय निवडणूक आयोगाने एसआयआर आणि राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे जाहीर खुलासा केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या वतीने बिहारमध्ये ‘व्होट अधिकार’ यात्रा सुरू करण्यात येणार आहे. सोळा दिवस ही यात्रा चालणार आहेत. तेजस्वी यादव देखील या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्याचवेळी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत सर्व आराोपांचे खंडण केले आहे.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतदार याद्यांमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरियाणा राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत मतचोरी झाली, असा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मतचोरी कशी झाली याचे पुरावे देखील दिले आहेत. राहुल गांधींच्या या आरोपांनंतर आयोगाने त्यांना ज्यांना चुकीच्या पद्धतीने यादीतून वगळले किंवा जोडले गेले अशा मतदारांची नावे सादर करण्यास सांगितले आहे. तसेच जर राहुल गांधींनी आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे दिले नाहीत, तर त्यांना माफी मागावी लागेल, असे देखील आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देशात मतचोरी होत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत पुरावे दिले, यावर उत्तर देताना निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. पण त्यात राजकीय भूमिका दिसली. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांना आयोगाने उत्तर दिली नाही. महाराष्ट्रात निवडणूक झाल्यावर सीसीटीव्ही फुटेज मागितले, अनेक पत्र लिहिली पण आयोग त्याला उत्तर देत नाही उलट राहुल गांधी यांच्याकडे पुरावे मागत आहे, हे गजब आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. निवडणूक आयोग आता स्वायत्त राहिला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. राहुल गांधी यांनी प्रश्न विचारले, ते माफी मागणार नाही असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या
मराठवाडा, पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाने मोठा फटका बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा, पैनगंगा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरले आहे. हाताशी आलेले पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
ज्वारी,कपाशी ,सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तर पशुधनाचे नुकसान झाले आहे. अकोला, यवतमाळ ,वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात पावसाने मोठा फटका बसला आहे. हजारो एकर वरील पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे वडेट्टीवार म्हणाले. अतिवृष्टीचे गेल्यावेळेचे पैसे अजून सरकारने दिले नाही त्यात पुन्हा एकदा पावसाने शेतकऱ्यांच्या हाताचे पिक गेले आहे. एकीकडे सरकार कर्ज काढत आहे आता शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने गरज पडली तर अजून कर्ज काढावे पण त्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी केली.