नागपूर: भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार याद्या व मतदान प्रक्रियेत मोठा घोळ घालून सत्ता मिळवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याविरोधात काँग्रेसचे आज नागपूर जिल्ह्यातील कामठीत ‘वोट चोर, गद्दी छोड’ मेळावा आहे. त्यासाठी कामठीच्या दिशेने कार्यकर्ते निघाले आहे. सर्वाधिक गर्दी जमावण्याची भिस्त ग्रामीणच्या नेत्यांवर आहे. त्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिकिटांचा विचार होणार असल्याचे या नेत्यांना सांगण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार याद्या व मतदान प्रक्रियेत मोठा घोळ घालून सत्ता मिळवली, असा काँग्रेस पक्षाचा गंभीर आरोप आहे. या कथित मतचोरीची पोलखोल काँग्रेसचे खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह केली आहे. त्यानंतर काँग्रेसने देशभरात ‘वोट चोर, गद्दी छोड’ आंदोलन सुरू केले असून त्याअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील कामठीत आज (बुधवारी, ३ सप्टेंबर) भव्य राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला आहे. काँग्रेसच्या मते, हे आंदोलन लोकशाहीवरील “मतांची चोरी” आणि “विश्वासघात” याविरोधात असून, जनतेला खऱ्या घडामोडींची जाणीव करून देण्यासाठी कामठीतील मेळावा ऐतिहासिक ठरणार आहे.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या मेळाव्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते सतेज पाटील, माजी मंत्री सुनिल केदार, काँग्रेस कार्यसमिती सदस्य यशोमती ठाकूर, मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, एआयसीसी सचिव कुणाल चौधरी, खा. श्यामकुमार बर्वे यांच्यासह अनेक आमदार, खासदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
गर्दी जमावण्याची जबाबदारी ग्रामीण नेत्यांवर
कामठीतील या मोठ्या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या नेत्यांवर गर्दी जमवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कामठी, हिंगणा, रामटेक, सावनेर, काटोल, उमरेड या तालुक्यांमधून तसेच नागपूर शहरातूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
पार्श्वभूमी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मतचोरी झाल्याचा संशय व्यक्त झाला होता. देशातील विविध मतदारसंघांसह महाराष्ट्रातही भाजपाने बोगस मतदारांची नोंदणी करून व मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करून विजय मिळवला, असा काँग्रेसचा आरोप आहे. कामठी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झालेल्या मतदार याद्यांतील गोंधळ आणि बोगस मतांची नोंदणी याचे पुरावे राहुल गांधी यांनी जनतेसमोर आणले. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्यभरात जागृतीसाठी मेळावे घेण्याचा निर्णय घेतला असून, कामठीतील मेळावा हा त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.