व्यक्ती, संस्था असो वा राजकीय पक्ष. अडचणीचा काळ सुरू झाला की त्यातून वाट कशी काढावी हे बरेचदा समजत नाही. हे असे प्रत्येकाच्या वाट्याला येते. त्यातून कुणीही सुटलेले नाही. तरीही अनेकजण जिद्दीच्या बळावर मार्गक्रमण करतात. ते कधी चुकते तर कधी दिशा देणारे ठरते. अशावेळी होणाऱ्या चुका दुरुस्त करण्याची तयारी संबंधितांनी ठेवायला हवी तरच अडचणीवर मात करत यशाचा मार्ग सापडतो. हे सर्व नमूद करण्याचे कारणही तसेच. सततच्या पराभवाने सध्या काँग्रेस पक्ष चाचपडतोय. कशासाठी तर त्यातून मार्ग काढण्यासाठी. सुदैवाने या पक्षाला सध्या चांगला प्रदेशाध्यक्ष लाभलाय. बंटी ऊर्फ हर्षवर्धन सपकाळ.
ते बुद्धिमान आहेत. विविध विषयांचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. सध्याच्या राजकारणात चलनी नाणे ठरलेल्या इतिहास व धर्मशास्त्रात त्यांना रूची आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातल्या त्यांच्या प्रतिक्रिया टोकदार असतात. टीकाही धारदार असते. हे झाले त्यांच्या नेतृत्वाचे वर्णन. आता त्यांच्या कृतीविषयी. यंदा गांधी जयंती व संघाची शताब्दी एकाच दिवशी साजरी झाली. सध्या यशाच्या शिखरावर असलेला संघ याचा अचूक फायदा उचलणार हे आधीपासून दिसत होतेच. त्याला कृतीतून प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने याच शहरातून सेवाग्रामपर्यंत संविधान यात्रा काढली. याचे नेतृत्व तुषार गांधींनी केले. सपकाळांनी पक्षाचा प्रमुख म्हणून हे जे केले ते योग्यच.
मात्र यावेळी संघावर टीका करताना त्यांची जीभ जरा घसरली. त्यांनी संघाची तुलना शिशुपालाशी केली व ज्याप्रमाणे शिशुपालाची शंभरी भरली त्याचप्रमाणे संघाचीही भरली, त्यामुळे आता संघ विसर्जित करायला हवा. संघ दहा तोंडाचा, त्याचे रावणाप्रमाणे दहन करायला हवे असेही ते बोलून गेले. एक विरोधक म्हणून संघाविषयीचा त्यांच्या मनात असलेला राग समजून घेता येण्यासारखा. मात्र तो व्यक्त करताना भाषा कशी असायला हवी याचेही भान त्यांनी बाळगणे गरजेचे. नेमके तेच सुटलेले दिसले.
काँग्रेसच्या बाबतीत असे वारंवार का घडते याचे उत्तर या पक्षाच्या विचारसरणीपासून दुरावत जाण्यात दडलेले आहे. कसे ते यानिमित्ताने समजून घ्यायला हवे. ना डावा ना उजवा तर मध्यममार्गी हीच काँग्रेसची खरी ओळख. या पक्षाला ज्यांचे मार्गदर्शन लाभले ते महात्मा गांधी असेच होते. या देशातली जनता श्रद्धाळू आहे. देव, धर्म मानणारी आहे. तेव्हा स्वातंत्र्याचे महत्त्व त्यांना पटवून द्यायचे असेल तर त्यांच्या कलाने चालायला हवे हे गांधींनी बरोबर ओळखले व लवकरच ते देशभरातील हिंदूंचे प्रेरणास्थान झाले. या देशात बहुसंख्येत असलेला हिंदू समाज त्यांच्यामागे ज्या प्रमाणात गेला तेवढा संघाच्या सुद्धा नाही. आज भलेही संघ हिंदूची सर्वात मोठी संघटना स्वत:ला म्हणवून घेत असेल तरी काँग्रेसच्या मागे उभे ठाकणाऱ्या हिंदूंची संख्या कमी नाही. हे वास्तव ध्यानात घेऊन सपकाळांनी संघावर टीका करायला हवी. काँग्रेस हा हिंदूंचा एकमेव पक्ष असे आज म्हणता येत नाही.
दुसरीकडे संघ व भाजप याच मुद्यावर उजळमाथ्याने वावरतो. अशावेळी धर्माच्या मुद्यावरून पुरोगामी ओरडतात तसे बेंबीच्या देठापासून सपकाळ वा त्यांच्या पक्षाने ओरडण्याची अजिबात गरज नाही. सपकाळांना आठवत असेल. भारत जोडो यात्रा दक्षिणेतून महाराष्ट्रात प्रवेश करेपर्यंत समाजाच्या सर्व स्तरातील लोक राहुल गांधींच्या या कृतीने भारावले होते. अकोल्यात आल्यावर त्यांनी सावरकरांचा मुद्दा काढला व गणित बिघडले. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वातील दोन्ही बाजू काँग्रेसच्या अनेक नेत्यांना आधीपासून ठाऊक होत्या.
अगदी नेहरूंपासूनचा काळ लक्षात घ्या. पण कुणीही हा मुद्दा काढला नाही. सावरकरांचा सर्वाधिक गौरव करणाऱ्यात काँग्रेसचे नेतेच होते. महाराष्ट्रात सावरकर जसे साहित्यिक म्हणून प्रचलित आहेत तसेच विज्ञाननिष्ठ म्हणून सुद्धा! मात्र संघाला लक्ष्य करण्याच्या नादात राहुल गांधींनी जी चूक केली ती धर्माच्या मुद्यावर तरी सपकाळांनी करू नये. धर्माचे वा धार्मिक संघटनांचे नाव न घेताही काँग्रेसच्या मागे हिंदू व इतर धर्मातील लोक उभे राहतात हे अनेकदा दिसले आहे. त्यामुळे काँग्रेसने थेट डावीकडे न वळता मधला मार्ग स्वीकारणे योग्य. जो हनुमानाचे स्तोत्र म्हणत केजरीवालांनी स्वीकारला.
यातला दुसरा मुद्दा आहे तो काँग्रेसने भाजपवर टीका करावी की संघावर हा. काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये पक्षाने संघावर टीका करू नये यावर बरीच चर्चा झाली. हिंदू म्हणून समाजातील मोठा वर्ग संघाकडे ओढला जात असेल तर त्याला परत आणण्यासाठी संघावर टीका करण्यापेक्षा भाजपचे अपयश त्याच्यासमोर उभे करणे हाच योग्य मार्ग असा सूर या पवित्र्यामागे होता. नंतर काळाच्या ओघात गुजरातमध्ये सुरू झालेली ही चर्चा मागे पडली. राहुल गांधींचा उदय झाल्यावर त्यांनी भाजपपेक्षा संघालाच जास्त लक्ष्य करणे सुरू केले. नेमके तिथून काँग्रेसचे राजकीय गणित बिघडत गेले. काँग्रेसने केलेल्या टीकेला संघ कधीही प्रत्युत्तर देत नाही ही बाबच अजून हा पक्ष लक्षात घ्यायला तयार नाही.
राहुल गांधींचे जाऊ द्या पण महाराष्ट्रात जर सपकाळांना पुन्हा या पक्षाला उभारी द्यायची असेल तर मध्यममार्गच स्वीकारायला हवा. पुरोगामी कठोर शब्दात संघावर टीका करतात पण त्यापैकी कुणालाही निवडणूक लढायची नसते. तसेच त्यांनी ती लढली तरी त्यांची निवडून येण्याची खात्री शून्य टक्के असते. त्यामुळे सपकाळांनी त्यांच्या नादाला न लागणे हेच उत्तम. प्रशिक्षण शिबिरात पुरोगाम्यांची भाषणे ठेवणे एकदाचे समजून घेता येईल पण त्यांची भाषा आत्मसात करणे काँग्रेसच्या हिताचे नाही. सध्याची लोकभावना काय? त्यांच्यात जाती, धर्माचे विष कुठवर कालवले गेले? त्यामुळे समाज वास्तवात भेडसावणाऱ्या समस्यांपासून दूर जातोय का? या प्रश्नावर सपकाळांनी विचार करणे गरजेचे.
गांधी असो वा तुकडोजी महाराज, किंवा गाडगेबाबा सुद्धा. या साऱ्यांनी जनतेत प्रबोधन करण्यासाठी धर्मश्रद्धांचाच आधार घेतला व त्यातले काय वाईट व काय चांगले हे लोकांपर्यंत पोहचवले. आजच्या काळात हे प्रबोधन करायचे असेल तर संघावर टीका करण्यापेक्षा वास्तवाची जाणीव करून देत समाजाला भानावर आणणे गरजेचे. ज्या व्रतवैकल्याचा, धार्मिक सणांचा उदोउदो उजव्यांकडून केला जातो ते सर्व काँग्रेस नेतेही घरात पाळतात. फक्त त्याचे अवडंबर माजवत नाही. हे सामान्यांना चांगले ठाऊक. त्यामुळे त्यापलीकडे जाऊन समाजाला भेडसावणाऱ्या समस्या ऐरणीवर आणण्याचे काम काँग्रेसने करणे गरजेचे. त्यासाठी गमावलेली संघटनात्मक शक्ती पुन्हा उभी करण्याचे मोठे आव्हान सपकाळांसमोर आहे. ते कडवे बोलून पेलता येणारे नाही. अलीकडे काँग्रेस प्रतिक्रियावादी झालेली. केलेल्या आरोपांना उत्तर देणे किंवा नवे आरोप करणे. यातून पक्ष चर्चेत राहतो पण वाढत नाही. नाना पटोलेंनी हीच चूक केली. ती सपकाळांनी करू नये. कारण त्यांच्याकडून अनेकांना अपेक्षा आहेत.
