scorecardresearch

पटोलेंविरोधात भाजप आक्रमक

शहरातील विविध पोलीस ठाण्यात भाजपने मंगळवारी पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

चंद्रशेखर बावनकुळे ताब्यात; विविध पोलीस ठाण्यात तक्रार

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेले आक्षेपार्ह विधान आणि जीवे मारण्याच्या कारस्थानांना दिलेला पाठिंबा लक्षात घेता पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत साकोलीत जर एकही मोदी नावाचा गुंड असेल तर अशा नावाच्या गुंडाला पटोलेंनी ३ दिवसांत जनतेसमोर आणि माध्यमांसमोर उभे करावे, असे आव्हान आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. शहरातील विविध पोलीस ठाण्यात भाजपने मंगळवारी पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बावनकुळे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी कोराडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. पटोले यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणा देत निषेध व्यक्त केला. काँग्रेसने पटोले यांना अध्यक्षपदावरून हटवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना सात मागण्यांचे निवेदन दिले आहे. या सातही मागण्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतरच आम्ही येथून जावू. नाना पटोले यांची पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची उंची नाही. काँग्रेसने त्यांची त्वरित अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली. दरम्यान कोराडी पोलीस ठाण्यात आंदोलन सुरू असताना बावनकुळे यांच्यासह आंदोलनकांना ताब्यात घेण्यात आले.  दरम्यान, शहरातील विविध भागातही नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. लकडगंज पोलीस ठाण्यात आमदार कृष्णा खोपडे व शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात तर बजाजनगर पोलीस ठाण्यात माजी महापौर संदीप जोशी यांनी तक्रार करत पटोले यांचा निषेध केला. शहरात बडकस चौक परिसरात नाना पटोलेच्या विरोधात आंदोलन करत त्यांचा निषेध करण्यात आला.

खोपडे करोनाग्रस्त, मग आंदोलनात कसे?

सामान्य माणसाला करोनाचा संसर्ग झाला तर किमान सात दिवस गृह विलगीकरण सक्तीचे केले जाते. पूर्व नागपूरचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांना चार दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली तरी ते मंगळवारी आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग त्यांच्यावर कारवाई  करणार का याकडे आता लक्ष लागले आहे. खोपडे मंगळवारी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, खोपडे यांनी सांगितले, गुरुवारपारपासून सोमवापर्यंत पाच दिवस घरीच विलगीकरणात होतो. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आंदोलनात सहभागी झालो.

मोदी टोपण नावाचा गावगुंड नसेल तर कारवाई करा- पटोले 

टोपण नाव मोदी असलेला गावगुंड नसेल आणि त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार नसेलतर मी केलेल्या वक्तव्याबाबत पोलिसांनी निश्चित कारवाई करावी, असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन केले. ते आज मंगळवारी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. पटोले म्हणाले, मी लोकांचे गाऱ्हाणे ऐकत होतो. भाषण करत नव्हतो. लोकांच्या तक्रारी गावगुंडाविषयी होत्या. त्यासंदर्भात बोलत होतो. परंतु भाजप त्याचा संबंध पंतप्रधानांशी जोडून महनिय व्यक्तीची गरिमा घालवत आहे. भाजप माझ्या अटकेच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करुन महाराष्ट्रातील सौहार्दतेचे वातावरण बिघडवत आहे.  ललित मोदी, निरव मोदी हे देशाचा पैसा घेऊन परदेशात पळाले. केवळ पंतप्रधानांचे नाव मोदी नाही तर असे अनेक मोदी आहेत, असेही पटोले म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress nana patole bjp aggressive pm modi ysh

ताज्या बातम्या