गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, जिल्ह्याच्या परिस्थितीत विशेष सुधारणा झाली नाही. अधिकारी सामान्य नागरिकांच्या समस्या एकण्यास तयार नसून त्यांनाही नेत्यांप्रमाणे हवाई प्रवसाची सवय झाली आहे. असा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीने अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरची प्रतिकृती देत आंदोलन केले.

गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात २६ जूनला हे आंदोलन करण्यात आले. मागील तीन वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद घेऊन विकासाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यातील जनतेच्या समस्या कमी होण्याऐवजी अधिकच वाढत चालल्या आहेत. वादळामुळे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही, रानटी हत्तींचा उपद्रव वाढला असतानाही त्यांचा बंदोबस्त करण्यात आला नाही, सुरजागड खाणीतून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे अपघात वाढले असून, रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अशा स्थितीत मान्सूनच्या आधी रस्ते बंद करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढवली आहे, यामुळे जिल्ह्यातील नागरिक फार त्रस्त आहेत, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी म्हटले आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी शासनाने मोठा गाजावाजा करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मात्र, त्याच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता चांगल्या व सुरक्षित बसेस नाहीत. जेव्हा शेतकरी आणि अन्य नागरिक आपल्या समस्या घेऊन प्रशासकीय कार्यालयात जातात, तेव्हा त्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही. कंत्राटदारांचे शासकीय कामांचे देयके थकीत आहेत, नवीन कामाचे नियोजन झाले नाही, पावसाळा सुरू होऊनही बऱ्याच घरकुल धारकांना रेती मिळाली नाही, त्यांची देयके थकीत आहेत, मनरेगाचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत.

ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. बेरोजगारांना रोजगार नाही. जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पांकरिता शेतकऱ्यांशी कुठल्या प्रकारची चर्चा न करता सरसकट जमिनी अधिग्रहीत करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. तालुक्यातील अनेक अधिकारी मुख्यालयी राहत नाही, त्यामुळे नागरिकांना वारंवार संबंधित कार्यालयात जावे लागते. एकूणच जिल्ह्यातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री म्हणून जनतेचे दुःख समजून घ्यावे, अशी अपेक्षा आहे. परंतु मुख्यमंत्री गडचिरोतील केवळ शासकीय कार्यक्रमांसाठी हेलिकॉप्टरने येऊन लगेचच नागपूरला परत जातात. एवढेच नाही तर जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांचीदेखील हीच परिस्थिती आहे. सर्वसामान्य जनतेला भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही. नागरिक भेटायला गेल्यास ‘साहेब व्हीसीमध्ये किंवा बैठकीत व्यस्त आहेत’, असे उत्तर मिळते.

त्यामुळे पालकमंत्र्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी गाव किंवा किमान तालुकास्थळी यावे, या मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २६ जूनला हेलिकॉप्टर घ्या, पण गाव किंवा तालुकास्थळी या, हे अनोखे आंदोलन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उवस्थित होते.