नागपूर : काँग्रेसच्या १३८ व्या वर्धापन दिनानिमित्त २८ डिसेंबरला नागपुरात होणाऱ्या ‘है तैयार हम’ महारॅलीसाठी पक्षाने ८० सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सभेच्या जनजागृतीसाठी मंगळवारी युवक काँग्रेसतर्फे दुचाकी रॅली काढली गेली, तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सभास्थळाला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या सभास्थळाचे नामकरण ‘भारत जोडो मैदान’ असे करण्यात आले आह़े

हेही वाचा >>> वाघांच्या मृत्यूबाबतच्या आकडेवारीत तफावत; ‘एनटीसीए’ आणि ‘डब्ल्यूपीएसआय’कडे वेगवेगळया नोंदी

महारॅलीसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे सगळयाच राज्यांतील मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष, सर्व राज्यातील विरोधी पक्षनेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य यांच्यासह हजारो पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सभेसाठी प्रदेश काँग्रेसने ८० सदस्यीय समिती स्थापन केली असून सगळयांवर विविध जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही महारॅली दिघोरी नाकाजवळच्या ४० एकर परिसरात होणार असून तेथे मोठे मंडप व व्यासपीठ उभारले जात आहे. मंगळवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी सभास्थळाला भेट देत विविध कामांचा आढावा घेतला. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठा, ओबीसी वादामुळे राज्यात अशांतता

राज्यात सध्या सुरू असलेला ओबीसी विरुद्ध मराठा वाद हा सरकार प्रायोजित असून यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक अशांततेमुळे ५० हजारांहून अधिक छोटे-मोठे उद्योग राज्याबाहेर गेले आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. काँग्रेसच्या जाहीर सभेच्या निमित्ताने पटोले नागपुरात आहेत. त्यांनी मंगळवारी सांयकाळी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. पटोले म्हणाले, ‘फोडा आणि राज्य करा’ हे भाजपचे धोरण आहे, त्यासाठी दोन समाजात दरी निर्माण केली जात आहे. मात्र त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी महाराष्ट्राची सामाजिक वीण ही इतकी घट्ट आहे की ती उसवणार नाही.