अकोला : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कामाला लागण्याचे निर्देश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर वाशीम जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक, आमदार साजिद खान पठाण, माजी मंत्री सुनील देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष संघटक ॲड. गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संध्या सव्वालाखे, बैठक समन्वयक प्रकाश तायडे, राहुल बोंद्रे, शिवाजीराव मोघे, बबलू देशमुख, श्याम उमाळकर, बबनराव चौधरी, अशोक अमानकर, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. सुधीर ढोणे, हिदायत पटेल, डॉ. झिशान हुसेन, महेश गणगणे, महेंद्र गवई, महिला जिल्हाध्यक्ष पूजा काळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

दिवाळीनंतर न. प., मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी पाचही जिल्ह्यात पक्षाची काय परिस्थिती, किती जागी पक्ष मजबूत तर कुठे कमकुवत आहे? याचा आढावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतला. प्रत्येक जिल्हानिहाय बैठक घेत जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, बूथप्रमुख, ब्लॉक अध्यक्ष यांच्याशी त्यांनी वैयक्तिक संवाद साधला. परिस्थितीची माहिती जाणून घेतली. पक्षाला आगामी निवडणुकीत अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचा ‘कानमंत्र’ त्यांनी दिला. या बैठकीचे आयोजक आणि समन्वयक म्हणून प्रकाश तायडे यांनी जबाबदारी पार पाडली. सूत्रसंचालन कपिल रावदेव यांनी केले.

मदत देण्यात भाजप उदासीन

शेतकरी मोठ्या संकटात असताना त्याला भरीव मदत देण्यास भाजप युती सरकार उदासीन आहे. महाराष्ट्राने प्रस्ताव पाठवला की मदत देऊ हे वेळकाढूपणा व असंवेदनशीलपणाचे लक्षण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याआधीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदती जाहीर करायला हवी होती, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

‘राष्ट्रवादी’ च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत अकोला जिल्ह्यातील पातूरचे माजी नगरपरिषद अध्यक्ष हिमायत खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पातूर शहर अध्यक्ष शाकीर हुसेन उर्फ गुड्डू पहलवान, मेहताब रऊफ, अनिकभाई पटेल, इसामोद्दीन ऊर्फ मुन्ना मेडिकल, शारिक शाबीर, नईम यासीन, रफीक भाई, राहुल वाघमारे, यांच्यासह नगरपरिषद व ग्राम पंचायत सदस्य यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.