वर्धा : सौंदर्यकरण व पर्यावरण रक्षणाचा हेतू ठेवून वृक्ष लागवड उपक्रम आता मोठ्या प्रमाणात जनतेचा जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. विद्यार्थी पातळीवर पण हा उपक्रम शाळांमधून जोरात सूरू आहे. पण रोपटे लावतांना त्याची उपयुक्ततादेखील विचारात घेण्याचा सल्ला निसर्गप्रेमी देत असतात. कारण पर्यावरनास तारक झाडे असतात तशी मारक किंवा विषारी झाडे पण आहेत. आता शहरात तसेच महामार्गाच्या दुतर्फ किंवा दुभाजकाच्या जागेत एक झाड मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहे. अल्पावधित, कमी पाण्यात व काटक असे हे झाड म्हणजे कोनोकोर्पस ही प्रजाती होय. हे जगातील उष्ण कटीबंधिय प्रदेशातील असून मूळ कॉबरेटाशी कुटुंबातील फुलांच्या दोन प्रजातीपैकी एक वंश होय. एक प्रकारची खारफूटीची व्यापक प्रजाती म्हटल्या जाते.

लवकर हिरवाई निर्माण करणारे हे झाड आता शहरात मोठ्या प्रमाणात लावल्या जात आहे. मात्र हे झाड धोकादायक असल्याचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या केंद्रीय शक्तिप्रदत्त समितीने नुकताच दिला आहे. या समितीने सर्वोच्च न्यायालयात ४० अहवाल याविषयी सादर केला आहे. त्यात कोनोकोर्पस प्रजाती पर्यावरण तसेच परिसंस्थेचे अस्तित्व यासाठी अयोग्य असल्याचे नमूद केले आहे. हे झाड निसर्गातील जैव विविधतेस धोका निर्माण करणारे असल्याने तसेच त्यापासून होणारा उपद्रव लक्षात घेऊन या झाडाची लागवड नकोच, असे समितीने स्पष्ट केले आहे. या झाडाचा दाट व रसायनयुक्त विस्तार इतर झाडांची वाढ थांबवितो. तसेच नैसर्गिक पुर्ननिर्मिती थांबवितो, असे या समितीने निदर्शनास आणले.

हा आदेश गंभीरतेने घेणे आवश्यक असल्याचे मत निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष व इंदिरा गांधी राष्ट्रीय पर्यावरण पुरस्कारप्राप्त मुरलीधर बेलखोडे व्यक्त करतात. त्यांनी निदर्शनास आणले की कोनोकोर्पस याचे दुष्परिणामच अधिक. ते लक्षात आल्याने २०२२ मध्ये तेलंगणा, २०२३ मध्ये गुजरात, २०२५ मध्ये आंध्र प्रदेशाने व तामिळनाडू सरकारने या झाडावर बंदी घातली आहे. इतर राज्ये देखील बंदीचा विचार करीत आहे. म्हणून हे झाड नकोच, अशी भूमिका वृक्षप्रेमी जनतेने घेऊन वड, पिंपळ, नीम, बकुळ अशा झाडांची निवड करण्याचे आवाहन बेलखोडे करतात. या झाडाचा झपाट्याने प्रसार होण्याचे मुख्य कारण म्हणजे ते लवकर व कमी पाण्यात वाढते. बाराही महिने हिरवे गर्द राहते. उष्णता व धूळ शोषून घेत असल्याने सार्वजनिक ठिकाणी लावण्यास पालिका उत्साही असतात.

पण ते तेव्हडेच घातक पण असल्याची शास्त्रीय माहिती दिल्या जाते. या कोनोकोर्पस झाडाची मुळे मोठ्या प्रमाणात जमिनीतील पाणी शोषून घेतात. मातीतील उपयुक्त खनिजे ओढून घेतात. इतर झाडांना वाढू देत नाहीत. झाडाच्या सानिध्यात राहणाऱ्यात श्वसनाचे विकार बळावतात. त्वचेस खाज सुटू शकते. रस्त्यावरील ही झाडे काँक्रिटला पण तडे देवू शकतात. असे वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष व पर्यावरण चळवळीत अग्रेसर डॉ. सचिन पावडे नमूद करतात. ते म्हणाले की सर्वप्रथम कराची पालिकेने या झाडावर बॅन आणला होता. गल्फ भागात पण मोठ्या प्रमाणात झालेली लागवड त्रासदायक ठरली. आपल्याकडे वन खात्याने नव्याने ही झाडे लावण्यास मनाई केली आहे. आपणही सावध झालेले बरे, असे डॉ. पावडे सांगतात. मधमाश्या या झाडावर बसत नाही. प्रदूषण निर्मिती करणाऱ्या किटकांचे यावर वास्तव्य असते, अशी माहिती पुढे आली आहे.