लोकसत्ता टीम
नागपूर: ऑरेंज सिटी प्रकल्पांतर्गत नागपुरात आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरण केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. या केंद्रामध्ये एकाचवेळी ५०० मुले पोहतील, अशी व्यवस्था राहणार आहे. शिवाय एक हजार लोक व्यायाम करू शकतील असा हेल्थ क्लब देखील उभारण्यात येणार आहे.
शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित धनवटे नॅशनल कॉलेजच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख क्रीडा महोत्सवाच्या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. हे जलतरण केंद्र महापालिकेच्या वतीने निर्माण होणार असून. त्यांना अत्यल्प दरात ही सुविधा देण्यात येईल. हे जलतरण केंद्र आंतरराष्ट्रीय पातळीवर राहणार असून सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा राहणार आहे.
आणखी वाचा-नागपूरच्या प्रमुख व्यापारपेठेत जायचे कसे? प्रमुख रस्ते बंद
याशिवाय एकाचवेळी एक हजार लोक व्यायाम करू शकतील असा हेल्थ क्लब देखील या ठिकाणी नागपूरकरांसाठी निर्माण होईल, असेही गडकरी यांनी सांगितले. शहरातील मुले मैदानांवर खेळली पाहिजे, यासाठी साडेतीनशे मैदाने तयार होत आहेत. यातील दीडशे मैदाने सज्ज झाली आहेत. समाजाच्या प्रत्येक घटकातील खेळाडूला आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले.