नागपूर: राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागासह (पीड. ब्लू. डी.) इतरही विभागातील विविध बांधकामाशी संबंधित ८९ हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण केल्यावरही शासनाकडून कंत्राटदारांना देयक दिले जात नाही. त्यामुळे आर्थिक विनंचनेतून सांगलीतील एका कंत्राटदाराने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. आता नागपुरातही सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी (१ सप्टेंबर २०२५) एका कंत्राटदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यावर कंत्राटदारांची संघटना संतापली आहे.

पी. व्ही. वर्मा उर्फ मुन्ना वर्मा (५०) रा. राज नगर, असे नागपुरात आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. त्याचे कुटुंब आत्महत्या केली तेव्हा हैद्राबादला होते. तेथेही वर्मा यांचे कुटुंब राहते. अधून- मधून कुटुंब नागपुरात वा मुन्ना वर्मा हे हैद्राबादला काही दिवस जाऊन राहत होते. मागील आठ दिवसांपासून वर्मा यांच्या कुटुंबियांतील एकही सदस्य नागपुरात नव्हते. त्यामुळे मुन्ना वमा हे नागपुरातील राज नगर येथील निवासस्थानी एकटेच होते. या दरम्यान त्यांनी आर्थिक कोंडीमुळे टोकाचे पाऊस उचलल्याची शंका महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे व्यक्त केली.

दरम्यान राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतरही शासकीय विभागातील ठेकेदारांच्या थकीत रकमेचा प्रश्न गंभीर होत आहे. अनेक महिन्यांपूर्वी कामे पूर्ण झाल्यावरही शासाकडे थकलेली प्रलंबित असलेली कोट्यवधी रुपयांची देणी प्रलंबित राहिल्यामुळे सगळेच लहान कंत्राटदार मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहे.

शासनाकडे ३० ते ४० कोटींची देयके थकलीत

पी. व्ही. वर्मा उर्फ मुन्ना वर्मा (५०) रा. राज नगर, नागपूर हे सार्वजनिक बांधकाम विभागासह इतरही काही विभागातील कंत्राटाची कामे करत होते. त्यांचे ३० ते ४० कोटी रुपयांचे देयक शासनाकडे थकीत आहे. ते सातत्याने संबंधित विभागात देयकासाठी गेल्यावर त्यांना शासनाकडून पैसे आले नसल्याचे सांगण्यात आले होते. दुसरीकडे त्यांनी ही कामे करण्यासाठी उसनवारीवर घेतलेले साहित्य घेतलेले व्यवसायिक व व्यक्ती त्यांच्याकडे पैशाची मागमी करत होते. त्यामुळे ते आर्थिक कोंडीत सापडले होते. मागील काही दिवसांपासून ते तनावात होते. त्यात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांच्या तपासात या आत्महत्येचे कारण कळणार आहे.

संघटनेचे म्हणणे काय ?

राज्यात शेतकरी आत्महत्ये प्रमाणेच आता शासनाच्या बेताल धोरणामुळे कंत्राटदारही आत्महत्या करायला लागले आहे. शासनाने राज्यभरातील कंत्राटदारांची ८९ हजार कोटीहून अधिक देयक थकवले आहे. देयक मिळत नसल्याने पूर्वी सांगली आणि आता नागपुरात कंत्राटदाराने आत्महत्या केली. शासनाने तातडीने कंत्राटदारांची देयक देऊन न्याय द्यावा. अन्यथा आणखी आत्महत्या वाढू शकतात. देयकासाठी आता तिव्र आंदोलन केले जाईल, असे प्रसिद्धीपत्रकातून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने सांगितले.