छुप्या पद्धतीने काळय़ा यादीतील ‘गुप्ता कोल’ संस्थाच काम करत असल्याची शंका

महेश बोकडे

नागपूर : महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने (एमएसएमसी) महानिर्मितीसाठी कोळसा धुण्याचे काम ‘हिंदू महामिनरल एलएलपी’सह इतर कंपन्यांना दिले. यापैकी काहींच्या वॉशरीज व कार्यालय हे काळय़ा यादीतील पद्मेश गुप्ता यांच्या गुप्ता कोलच्या वास्तूत असून हे काम छुप्या पद्धतीने गुप्ता कोल ही संस्थाच करत असल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे. या वॉशरीजमध्ये येणाऱ्या कोळशातील चांगला कोळसा खुल्या बाजारात छुप्या पद्धतीने विकला जात असून निकृष्ट कोळसा महानिर्मितीला पुरवला जात असल्याचीही तक्रार आहे.

महानिर्मितीमध्ये २०११ पूर्वी कोळसा धुण्याचे काम गुप्ता कोलसह इतर काही कंपन्यांकडे होते. या कामात मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाल्याने २०११ नंतर महानिर्मितीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळसा न धुताच वापरणे सुरू झाले. या घटनेनंतर गुप्ता कोलला काळय़ा यादीत टाकले गेले. आता गुप्ता कोल आणि महानिर्मितीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे गुप्ता कोलला महानिर्मितीशी संबंधित निविदेत सहभाग घेता येत नाही. दरम्यान, धुतलेल्या कोळशाने वीज निर्मितीदरम्यान प्रदूषण कमी, वीजनिर्मिती संच जास्त कार्यरत राहण्यासह विजेचा दर्जा चांगला राहत असल्याचे सांगत महानिर्मितीने पुन्हा धुतलेला कोळसा वापरण्याचे ठरवले.

निविदा प्रक्रिया पारदर्शी करण्याच्या नावाने त्रयस्थ संस्था म्हणून खनिकर्म महामंडळाच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया केली गेली. त्यात मार्च २०२१ मध्ये १७.५८ मिलियन टन कोळसा धुण्याचे कंत्राट हिंदू महामिनरल, एसीबी, रुक्माई आणि इतर एक अशा एकूण चार कंपनीला दिले गेले. कंत्राटानुसार या कंपन्यांना वेकोलि आणि एसईसीएलच्या खाणीतून महानिर्मितीला मंजूर निश्चित वजनाचा कोळसा उचलून तो धुवून महानिर्मितीच्या विविध प्रकल्पाला पुरवठा करायचा आहे. यावेळी दर्जानुसार कोळसा धुतल्यानंतर त्यातील जवळपास २० टक्के चिखल, माती, दगड निघून जातात. त्यामुळे शिल्लक ८० टक्केच्या जवळपास कोळशाचा पुरवठा विविध महानिर्मिती प्रकल्पाला करायचा आहे. परंतु या २० टक्क्यांमध्ये खूप घोळ असून  मोठय़ा प्रमाणावर कोळशाची अफरातफर होऊन हा कोळसा थेट खुल्या बाजारात विक्रीला जात असल्याचा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनोद दत्तात्रय यांचा आरोप आहे. जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनीही याबाबत आक्षेप घेतला आहे. खाणीतून निघालेला धुतल्यावरही दर्जेदार कोळसा नियमबाह्य खुल्या बाजारात विक्रीला जात असून चुरीसह निकृष्ट कोळशाचा पुरवठा चंद्रपूरसह इतरही काही वीज प्रकल्पात होत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

कोळशाची स्थिती

हिंदू महामिनरलने वेकोलिच्या विविध खाणीतून ८ मार्च ते २० ऑगस्ट २०२१ दरम्यान १३ लाख ९३ हजार ९२४.९५ मेट्रिक टन कोळशाची उचल झाली. हा कोळसा गोंडगाव, घुग्गुस,पिंपळगाव (वणी) या कोल वॉशरीजमध्ये धुऊन १० लाख ५२ हजार ४७९.३१ मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा महानिर्मितीला केला गेला. एसीबीने या कालावधीत वेकोलितून ४ लाख ३४ हजार ५४९.०९ मेट्रिक टन कोळशाची उचल करून तो कार्तिकेय आणि पंढेरपौनी वॉशरीजमध्य धुतला. यापैकी ३ लाख ५१ हजार ९१४.०९ मेट्रिक टन पुरवठा महानिर्मितीला केला.

गुप्ता कोल ही कंपनी विविध अडचणींमुळे बंद (लिक्विटेड) झाली आहे. त्यामुळे  ही कंपनी वा त्यातील व्यवस्थापनातील व्यक्तीचे हिंदू महामिनरल वा कोळसा धुणाऱ्या इतर कंपन्यांशी काहीही संबंध असण्याचे कारण नाही. हिंदू महामिनरल व त्यातील व्यवस्थापनाबाबत आम्हाला काहीही माहिती नाही.

पीयूष मरोडिया, संचालक, गुप्ता कोल.

हिंदू महामिनरल एलएलपी ही बिलासपूरची कंपनी आहे. आमचा गुप्ता कोल वा पद्मेश गुप्ताशी संबंध नाही. कंपनीकडून कंत्राटातील नियम पाळत काम केले जात आहे. कंपनीने कोळसा धुण्यासाठी काही वॉशरीज भाडय़ाने घेतल्या आहेत. त्यामुळे निकृष्ट  कोळशाचा पुरवठा करीत असल्याचा आरोप खोटा आहे.

अतुल कोटेचा, जनसंपर्क अधिकारी, हिंदू महामिनरल एलएलपी.

कोळसा धुण्याचे कंत्राट महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने विविध कंपन्यांना दिले आहे. त्यामुळे या तक्रारींचे प्रकरण आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही. आमच्याकडे यापद्धतीच्या काही तक्रारी आल्या होत्या, परंतु त्या आम्ही खनिकर्म महामंडळाकडे वर्ग केल्या. त्यामुळे या तक्रारींवर खनिकर्म महामंडळ जास्त सांगू शकेल.

पुरुषोत्तम जाधव, संचालक (खनिकर्म), महानिर्मिती, मुंबई.

कागदोपत्री कोळसा धुण्याचे काम हे हिंदू महामिनरलसह कंत्राट मिळालेल्या कंपन्याच करत आहेत. महामंडळाने विविध कंपन्यांची नोंदणीशी संबंधित विभागात सर्व कागदपत्रांसह चौकशी केली असता एकाही कागदावर या कंपन्यांचा गुप्ता कोलशी कंपनीचा संबंध आढळला नाही.

पी. वाय. टेंभरे, महाव्यवस्थापक राज्य खनिकर्म महामंडळ लिमी., नागपूर.