पूर्व विदर्भातील २६ पालिकांचा समावेश
डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या काळात मुदत संपणाऱ्या राज्यातील १९५ नगर पालिकांची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार २४ जूनपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. यात नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्य़ातील ९ नगरपालिकांसह एकूण २६ पालिकांचा समावेश आहे.
राज्य शासनाने नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काही बदल केले आहेत. नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होणार आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यभरात होणाऱ्या पालिकांच्या निवडणुकांमध्ये नागपूर विभागातील २६ पालिकांचा समावेश आहेत. या पालिकांमधील प्रभागाची रचना आणि आरक्षण ठरविण्याची प्रक्रिया २४ जूनपासून सुरू होणार आहे.राज्य निवडणूक विभागाचे उपसचिव ध.मा. कानेड यांनी प्रभाग आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार तो १० ऑगस्टपर्यंत चालणार असून या दिवशी अंतिम प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त मान्यता देतील. तत्पूर्वी २४ तारखेला संबंधित पालिकांचे मुख्याधिकारी सीमांकनाचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सोपवतील. त्यावर २९ जूनपर्यंत जिल्हाधिकारी निर्णय घेतील. २ जुलै रोजी सोडत काढली जाईल. ५ जुलै रोजी त्यावर हरकती आणि सूचना मागविल्या जातील आणि २७ जुलै रोजी त्यावर सुनावणी होईल.
नागपूर विभागातील पालिकांमध्ये नागपूर जिल्ह्य़ातील काटोल, कामठी, उमरेड, नरखेड, कळमेश्वर, मोहपा, सावनेर, खापा आणि रामटेक या ९ पालिकांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे वर्धा जिल्ह्य़ातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, सिंदी, पुलगाव, देवळी, चंद्रपूर जिल्ह्य़ातील बल्लारपूर, वरोरा, मूल, राजुरा, भंडारा जिल्ह्य़ातील भंडारा, तूमसर, पवनी, गोंदिया जिल्ह्य़ातील गोंदिया, तिरोडा आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील गडचिरोली आणि देसाईंगज या पालिकांचा समावेश आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे बिगूल वाजणे सुरू होईल. दरम्यान, निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतही तेवढीच महत्त्वाची असल्याने याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
विभागातील जिल्हानिहाय पालिका
(डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या काळात मुदत संपणाऱ्या)
नागपूर -काटोल, कामठी, उमरेड, नरखेड, कळमेश्वर, मोहपा, सावनेर, खापा आणि रामटेक
वर्धा – वर्धा, हिंगणघाट, आर्वी, सिंदी, पुलगाव, देवळी,
चंद्रपूर – बल्लारपूर, वरोरा, मूल, राजुरा
भंडारा -भंडारा, तूमसर, पवनी
गोंदिया -गोंदिया, तिरोडा
गडचिरोली -गडचिरोली आणि देसाईंगज