चंद्रशेखर बोबडे

प्राण्यांपासून मानवाला होणाऱ्या आजारांवर संशोधन करण्यासाठी नागपुरात सुरू करण्यात आलेले देशातील पहिले ‘वन हेल्थ सेंटर’ राज्य सरकारच्या अनास्थेचा बळी ठरले आहे.

केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये मंजूर केले. त्यापैकी १० कोटी प्राप्तही झाले. जागाही मिळाली. पण उर्वरित ९० कोटींसाठी आवश्यक असणारा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) राज्य सरकारने केंद्राकडे सादर न केल्याने ही रक्कम दीड वर्षांपासून मिळू शकली नाही. विशेष म्हणजे, अशाप्रकारच्या केंद्राची घोषणा अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सोमवारी केली. पण ते कोठे होणार हे काहीच सांगितले नाही. नागपुरातीलच केंद्राला विकसित केले जाईल, अस या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

‘वन हेल्थ सेंटर’ ही मूळ संकल्पना जागतिक आरोग्य संघटनेची आहे. जगात अनेक आजारांचा उगम हा प्राण्यांपासून, वातावरणातील बदल यातून होत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. करोनाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे पशुवैद्यकीय तज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञांना संयुक्तपणे वरील आजारावर एकाच ठिकाणी संशोधन करता यावे, हा या केंद्रामागचा हेतू आहे. दोन वर्षांपूर्वी  राज्यसभेचे सदस्य पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी याचा अभ्यास करून अशा प्रकारचे एक केंद्र नागपुरात सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. केंद्राने त्याला मान्यता दिली. आयसीएमआर, नॅशनल इस्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे आणि महाराष्ट्र पशू व मत्स विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प नागपुरात सुरू करण्याचे निश्चित झाले. यासाठी केंद्र सरकारने १०० कोटींचा निधी मंजूर केला. तत्कालीन फडणवीस सरकारच्या प्रयत्नातून केंद्रासाठी पशु व मत्स विद्यापीठाने चार हेक्टर जागाही दिली. मंजूर निधीपैकी १० कोटी रुपये प्राप्त झाल्यावर केंद्राचे बांधकामही सुरू झाले. प्राथमिक स्तरावर एक प्रयोगशाळा सुरू करण्यात आली.

हे केंद्र सुरू होण्यास दोन ते तीन वर्षांचा वेळ लागेल, असे पशुवैद्यकीय महाविद्यालयातील सामूहिक आरोग्य विभागाचे  प्रमुख डॉ. संदीप चौधरी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात डॉ. विकास महात्मे यांच्याशी संपर्क साधला असता  ते म्हणाले, प्रकल्प अहवालासाठी केंद्राचा निधी थांबलाय. या केंद्राला गती मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली व लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा, अशी विनंती केली. हे केंद्र सुरू झाले तर देशातील अशा प्रकारचे ते पहिले असेल, असेही त्यांनी सांगितले.