नागपूर : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीने प्रियकराशी वाद झाल्यानंतर एकत्र राहण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीला रस्त्यावर मारहाण करीत अश्लील चाळे केले. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुुन्हा दाखल करून अटक केली. अभिजित राजेंद्र शेंटे (२५) सावरबांधे ले आऊट असे आरोपीचे नाव आहे.
पीडित २४ वर्षीय तरुणी ही एका खाजगी दवाखान्यात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. ती महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिच्यासोबत अभिजित देखील शिकत होता. त्या दरम्यान दोघांची मैत्री झाली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनीही एकमेकांची आपापल्या घरी ओळख करून दिली आणि लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे दोघांचेही एकमेकांच्या घरी ये-जा होती. त्यांनी लग्न होईपर्यंत पती-पत्नीप्रमाणे सोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही गेल्या सहा महिन्यांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहात होते.
काही दिवसांपूर्वी एका मित्राकडे आयोजित कार्यक्रमात अभिजितने तिचा अपमान केला होता. तसेच तिच्याशी मित्रांसमोर अश्लिल वर्तन केले होते. त्यामुळे तरुणी संतापली. तिने त्याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध तोडून त्याच्याशी बोलणे बंद केले होते. त्यामुळे अभिजित संतापला. तो तिला भेटण्यासाठी तिच्या दवाखान्यात आणि वसतीगृहासमोर चकरा मारत होता. २१ जुलै रोजी रात्री ८.३० च्या सुमारास अभिजित हा तरुणीच्या वसतीगृहासमोर आला. तिच्याशी अश्लील चाळे करून तिला सोबत राहण्यासाठी बळजबरी करू लागला. तिने सोबत राहण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने तिला शिवीगाळ करीत धमकी दिली.
त्याच दिवशी मुलगी आपल्या गावाला गेली आणि वडिलांना ही माहिती दिली. त्यानंतर वडिलांना सोबत घेऊन तिने भंडारा पोलीस ठाणे गाठले. परंतु, घटनास्थळ नागपुरातील असल्याने भंडारा पोलिसांनी तिला नागपुरात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर ती अंबाझरी पोलीस ठाण्यात आली आणि अभिजितच्या विरोधात तक्रार केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आशिष कोहळे यांनी अभिजितवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.