अमरावती : शहरातील अनेक कॉफी कॉर्नर, फास्ट फूड सेंटर व काही हॉटेल्समध्ये प्रेमीयुगुलांना अश्लील चाळे करण्यासाठी पैसे मोजून जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस कारवाईतून गेल्या काही दिवसांमध्ये समोर आला आहे. गानुवाडी परिसरातील ग्राउंड व्ह्यू कॉफी कॉर्नरमध्येही असे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर राजापेठ पोलिसांनी या तेथे छापा टाकून दोन प्रेमीयुगुलांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडले.

शहरातील अनेक कॉफी कॉर्नर, फास्ट फूड सेंटर व काही हॉटेलमध्ये कम्पार्टमेंट तयार करून प्रेमीयुगुलांना तासाप्रमाणे पैसे मोजून अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पोलीस आयुक्तांचे विशेष पथक आणि गाडगेनगर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पंचवटी चौक परिसरातील एका मॉलमधील फास्ट फूड कॉर्नर, कठोरा मार्ग व सहकारनगर येथील कॅफे हाऊसवर धाड टाकून केलेल्या कारवाईनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे, फ्रेजरपुरा ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या एका बलात्काराच्या गुन्ह्यातील घटनास्थळही पंचवटी चौकातील सदर मॉलमधील फास्ट फूड सेंटर असल्याचे पीडित मुलीच्या बयाणावरून समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी शहरातील तरुणाईची वर्दळ राहणाऱ्या कॉफी कॉर्नर, फास्ट फूड सेंटर व काही हॉटेलवर लक्ष ठेवून तपासणी सुरू केली. त्या अनुषंगाने राजापेठ पोलिसांनी गानुवाडी परिसरातील ग्राउंड व्ह्यू कॉफी कॉर्नरची झडती घेतली. यावेळी या कॉफी कॉर्नरमध्ये दोन जोडपी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आलेत. पोलिसांनी दोन्ही जोडप्यांसह कॉफी कॉर्नरचा मालक सुमित देवरे (रा. चवरेनगर) यांना ठाण्यात आणून त्यांच्यावर कारवाई केली.