यवतमाळ : येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील गैरप्रकारामुळे ठेवीदारांच्या ठेवी बुडाल्या. या भ्रष्टाचाराने बँक अवसायानात निघाली. बँकेतील या गैरप्रकाराला जबाबदार असलेल्या बँकेच्या अध्यक्षासह संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी व अधिकार्यांकडून तब्बल ९७ कोटी दोन लाख १७ हजार ७५८ कोटी रुपये, कर्ज दिल्याच्या तारखेपासून १५ टक्के व्याजासह वसूल करण्यात यावे, असे आदेश सहकारी संस्थांचे अपर निबंधक (प्रशासन) शैलेश कोतमिरे यांनी अवसायक तथा जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. या आदेशाने सहकार विभागात खळबळ उडाली. या आदेशात संचालक मंडाळच्या अध्यक्षांसह १६ जणांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> भंडाऱ्यात शिंदे गटाच्या आमदाराच्या मतदारसंघात भाजपची मतपेरणी!
बाबाजी दाते महिला सहकारी बँक महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्याखालील नियमान्वये नोंदणीकृत सहकारी बँक आहे. या बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे. ही बँक सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाच्या अधिकार कक्षेत येते. बँकेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम ८८ (१)अन्वये चौकशी करून संबंधित अपहारकर्त्यांवर बँकेत झालेल्या नुकसानाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी २५ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या आदेशान्वये अॅड. आर. बी. खोंड यांना प्राधिकृत करण्यात आले होते. त्यांनी कायदा कलम वरील कायद्यानुसार २०मे २०२३ ला आदेश पारीत केला. सदर बँकेस ९७ कोटी दोन लाख १७ हजार ७५८ रुपयांचे नुकसान झाले झाले आहे. आर्थिक नुकसानाची जबाबदारी संचालक, अधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. सदर रक्कम वसूल झाल्यावर ती बँकेच्या निधीत जमा करण्यात येईल. अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक यांनी संबंधितांना प्रमाणपत्राची पोहोच करावी, असेही निर्देश अपर निबंधक (प्रशासन) शैलेश कोतमिरे यांनी दिले आहेत.
हेही वाचा >>> वरोरा विधानसभा मतदारसंघाने दोन वर्षात तीन बडे नेते गमावले; ॲड.टेमुर्डे, देवतळे व धानोरकर यांच्या निधनाने शोककळा
संचालक, अधिकाऱ्यांच्या नावासह जबाबदारीची रक्कम अध्यक्ष विद्या केळकर- ५५ कोटी दहा लाख ३६ हजार २२४ रुपये, संचालिका गीता मालीकर- १५ लाख, शोभा बनकर- १५ लाख, उषा दामले- १५ लाख, प्रणिता मुक्कावार- १५ लाख, प्रणिता देशपांडे- १५ लाख, सुशीला पाटील-एक कोटी, अनुराधा अग्रवाल-१५ लाख, मुख्य कार्यकारी अधिकारी- २५ कोटी एक लाख ८१ हजार ५३४ रुपये, उपसरव्यवस्थापक राजश्री शेवलकर – पाच कोटी, उपरसरव्यवस्थापक शीला हिरवे- पाच कोटी, वरिष्ठ अधिकारी जया कोषटकवार-एक कोटी, मंजुश्री बुटले-एक कोटी, कनिष्ठ अधिकारी पौर्णिमा गिरटकर-एक कोटी, सुरेखा गावंडे-एक कोटी, शीतल पांगारकर-एक कोटी याप्रमाणे जबाबदारीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.