नागपूर : कुख्यात शेखू खान टोळीचे दोन सदस्य मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची माहिती मिळताच हिरणवार टोळीने त्या आरोपींवर गोळीबार करुन शहरात दंगल घडवून आणण्याचा कट रचला होता.

मात्र, ते दोनही युवक मिरवणुकीत सहभागी न झाल्यामुळे शेखू टोळीचा दुसरा सदस्य अविनाश भुसारीवर गोळीबार करुन खून केला. भुसारी हत्याकांडातील पाच आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली असून अजून सहा आरोपी अद्यापही फरार आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी पत्रपरिषदेत दिली.

१४ एप्रिलच्या मध्यरात्री कॅफे मालक अविनाश भुसारी याची हिरणवार टोळीने सहा गोळ्या घालून खून केला होता. हे हत्याकांड पवन हिरणवार हत्याकांडाचा बदला म्हणून त्याचा भाऊ बंटी ऊर्फ शैलेष हिरणवार याने घडविले होते. या हत्याकांडात जवळपास १७ आरोपींचा समावेश असून यापूर्वीच पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. त्यात बंटीची प्रेयसी सिमरन लोखंडे हिचाही समावेश आहे.

अविनाशचा खून केल्यानंतर आरोपी बंटी हिरणवार (काचीपुरा), अंकित ऊर्फ बाबू धीरज हिरणवार (२२, काचीपुरा), आदर्श ऊर्फ गोट्या रत्नाकर वाळके, शिब्बू राजेश यादव (२०) आणि रोहित ऊर्फ भीक्कू राजू मेश्राम (२०) हे मध्यप्रदेशात पळून गेले होते.

पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता ही टोळी विशाखापट्टणम्, कोलकाता शहरात रेल्वेने पळत होते. आरोपींनी मोबाईल, सीमकार्ड बदलून गोंदियामध्ये मुक्कामी आले होते. गुन्हे शाखेला माहिती मिळताच या टोळीला अटक करण्यात आली. ही कारवाई उपायुक्त माकणीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश सांगळे यांच्या पथकाने केली.

प्रवेश गुप्ता-धीरज बांबुर्डे हे होते ‘टार्गेट’

शेखू खान टोळीच्या सदस्यांनी पवन हिरणवारचा गोळ्या घालून खून केला होता. या हत्याकांडाचा बदला म्हणून प्रवेश गुप्ता आणि धीरज बांबुर्डे या दोघांचा खून करायचा होता. हे दोघेही एका मिरवणुकीत सहभागी होणार होते. ते दोघेही मिरवणुकीत सहभागी न झाल्याने थोडक्यात वाचले. बंटी हिरणवारने कारागृहात असलेल्या अवी भुसारीचा चुलत भाऊ अविनाश भुसारीचा खून करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला कॅफे समोर जाऊन गोळ्या घालून अविनाशचा खून केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजीचे पैसे चोरुन घेतल्या पिस्तूल

बंटीची आजी किरण हिरणवार यांचे १ लाख २० हजार रुपये शिबू यादवने चोरले. त्या पैशातून बंटीने तीन पिस्तूल मध्यप्रदेशातील रिवा शहरातील शाहीद याच्याकडून तीन पिस्तूल विकत घेतल्या. राहुलने उत्तरप्रदेशातून २० काडतूस विकत आणले. हिरणवार टोळीने जंगलात झालेल्या दारुपार्टीत शेखू टोळीतील सदस्यांची हत्या करण्याचा कट रचला.