नागपूर : चोरलेल्या दुचाकीचा वाहनक्रमांक बदलत त्याची विक्री केल्यानंतर तीच दुचाकी पुन्हा चोरणाऱ्या सराईत वाहनचोराला गुन्हे शाखा युनिट पाचने रविवारी बेड्या ठोकल्या. धक्कादायक बाब म्हणजे या सराईत वाहनचोराकडे पोलिसांना देशी बनावटीचा कट्टा आणि एक जीवंत काडतूसही सापडले आहे. निलेश उर्फ अभि राजू कडबे (२८) असे जरिपटका भागातल्या समता नगरातील अट्टल वाहन चोराचे नाव आहे. निलेशला बेड्या ठोकताच गुन्हे शाखेने वाहन चोरीच्या पाच आणि अन्य चोरीच्या दोन अशा सात गुन्ह्यांचा छडा लावला. निलेश विरोधात यापूर्वीही तहसील पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे ९ गुन्हे दाखल आहेत.
कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री अडिचच्या सुमारास एक सराईत वाहनचोर शस्त्रांसह फिरत असल्याचा सुगावा गुन्हे शाखा पथक पाचला लागला होता. गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांचे पथक रात्री कपीलनगरातल्या पाटील ले आऊट येथे पोचले. तेथे बुवा यांना निलेश कडबे दिसला. तहसील पोलीस ठाण्यात असताना बुवा यांनीच कडबेला अनेकवेळा वाहनचोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यामुळे बुवा यांनी सर्वांत आधी त्याची झडती घेतली. त्यावेळी निलेशकडे देशी कट्टा आणि जीवंत काडतूस पोलीसांच्या हाती लागले. पथकाने लगेच त्याला बेड्या ठोकत ठाण्यात आणले. निलेकडून पोलिसानी एक यामाहा एमटी-१५ बाईक, दोन अॅक्टिव्हा स्कूटर, चार मोबाईल फोन, एक मोबाईल चार्जर, होंडा कारच्या चाव्या, एक लोखंडी रॉड, एक नंबर १ आर प्लेट, रोख १२ हजार असा ३ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
बैतूलमधून घेतला देशी कट्टा
गुन्हे शाखेच्या जप्त केलेला देशी कट्टा आणि काडतूस अट्टल वाहन चोर निलेश कडबेने मध्य प्रदेशातील बैतुल येथील अल्ताफ नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा येथील कारागृहात कैद असलेल्या फैजान नवाच्या आरोपीमार्फत अल्ताफची ओळख झाली होती. निलेशने अल्ताफकडून २० हजार रुपयांत हा देशी कट्टा खरेदी केला होता.
वाहन चोरीत सराईत
निलेश विरोधात वाहनचोरीचे १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. सराईत वाहनचोर असलेला निलेश हा चोरलेल्या वाहनाचा नंबर बदलून ते वाहन विकायचा. विकण्यापूर्वी तो वाहनाची बनावट चावी बनवून ठेवायचा. वाहन विकल्यानंतर तो त्या दुचाकीची पुन्हा चोरी करायचा आणि त्याचा वाहन क्रमांक बदलून पुन्हा तिसऱ्यालाच वाहन विकायचा. असाच प्रकार त्याने अमरावतीत केला होता. नागपूरातून चोरलेली यामाहा त्याने अमरावतीतल्या एका मुस्लीम व्यक्तीला विकली होती. हा व्यक्ती नमाज अदा करण्यासाठी गेला असता त्याने बनावट चावी वापरून ही दुचाकी चोरल नागपूर गाठले होते.