अमरावती : वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे आता अडचणीत सापडले असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात त्यांनी अमरावतीच्या कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल संभाजी भिडे यांच्या विरोधात येथील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजी भिडे, निशांदसिंह जोध, अविनाश जोध व कार्यक्रमाच्या इतर आयोजकांच्या विरोधात पोलिसांनी भादंवि १५३ (३), ५००, ५०५(२), ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापुरूषांविषयी वादग्रस्त विधान करून लोकांमध्ये असंतोष पसरविणे, विविध समाज घटकांमध्ये वाद वाढविणारे भाष्य करणे आणि महापुरूषांची बदनामी करणे, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानामुळे सध्या वाद पेटला असून संभाजी भिडेंविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे. राष्ट्रपित्याबाबत वाईट भाष्य करणे संपूर्ण देशासाठी लाजिरवाणे असून सरकारने बंदोबस्त करून त्यांना अटक करावी, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल विधानसभेत केली होती.