* अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची घरे उद्ध्वस्त * वसाहत परिसरातील वास्तव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शेजार लाभल्यानंतर सर्वसामान्य नागरिक स्वत:ला अधिक सुरक्षित समजतो. वसाहत जर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची असेल तर आजूबाजूच्या एक किमी परिसरात कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडणार नाही, असा विश्वास नागरिकांना असतो. मात्र, काटोल मार्गावरील पोलीस लाईन टाकळी परिसरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वसाहत गुन्हेगारीचा अड्डा झाली असून हा परिसर जुगार, सट्टा अशा अवैध धंद्याचे केंद्र ठरले आहे. या धद्यांमुळे अनेक पोलिसांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

पोलीस लाईन टाकळी परिसरात नागपूर शहर पोलिसांचे मुख्यालय, गुन्हे शाखेचे कार्यालय, वाहन प्रशिक्षण अधीक्षक (एमटी) कार्यालय आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांची जवळपास १ हजार ५०० पेक्षा अधिक घरे आहेत. परिसरात २४ तास खाकी ‘वर्दी’चा राबता असतो. त्यामुळे परिसरात गुन्हेगारीला वाव नसावा, असा सर्वसामान्य समज आहे. मात्र, या भागातील तलाव परिसरात मोठा जुगार अड्डा भरविला जातो. हे करणारा दुसरा तिसरा कोणी नसून पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आहे. शिवाय येथे जुगार खेळणारेही बहुतांश पोलीस कर्मचारीच असतात. ७ एप्रिलला पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार पोलिसांनी जुगार अड्डय़ावर छापा टाकला होता. त्यात विद्यमान आणि माजी अशा चार पोलीस कर्मचाऱ्यांना जुगार खेळताना अटक करण्यात आली होती. त्यानंतरही पुन्हा त्याच ठिकाणी अड्डा पूर्ववत सुरू आहे.

याशिवाय परिसरात मोठय़ा प्रमाणात सट्टा खेळला जातो. यात मोठय़ा प्रमाणात पोलीस कर्मचारी, त्यांची मुले गुंतलेली आहेत. अनेक पोलीस कर्मचारी आपली वाहने तारण ठेवून सट्टा लावतात.

अनेकांचा दरमहा वेतनाचा बहुतांश भाग सट्टय़ाची उधारी चुकती करण्यात जातो. पोलीस लाईन टाकळी आणि परिसरात जुगार अड्डे व सट्टा अड्डे चालत असताना त्यावर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. निदान सर्वसामान्य नागरिकांसाठी नाही, पण पोलिसांचे कुटुंब वाचविण्यासाठी तरी जुगार व सट्टा अड्डय़ावर कारवाई करावी, अशी मागणी नाव न छापण्याच्या अटीवर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

या ठिकाणी चालतो सट्टा

सर्वाधिक पोलीस कर्मचारी व त्यांची मुले बंटी चौधरी याच्याकडे सट्टा लावतात आणि तो गिट्टीखदान पोलीस ठाण्याला लागून असलेल्या खदान परिसरात सहा ते सात घरांमधून आपले काम करतो. मुन्ना बल्लारे हा टी.व्ही. टॉवर परिसरात सट्टा चालवितो. संतोष नावाचा सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सट्टा चालवित असल्याची माहिती आहे. याशिवाय गिन्नी नावाचा व्यक्ती जाफरनगर, दिनशॉ फॅक्टरी परिसर आणि नागपूर-नागरिक बँकेच्या विरुद्ध दिशेला बसून सट्टापट्टी घेतो. तर तुलसी नावाचा व्यक्ती मानकापूर पूल परिसरात सट्टय़ाचा व्यवसाय करतो. ठाकूर व निखार हे वाडी परिसरातील शिवाजीनगर झोपडपट्टी व नाका परिसरात हा अवैध व्यवसाय करतात. त्यांच्यावर स्थानिक पोलिसांची कृपादृष्टी असल्याचे सांगण्यात येते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criminal activity in police colony of nagpur
First published on: 13-06-2017 at 02:26 IST