नागपूर : राज्यात गेल्या चार वर्षांत एक लाख नऊ हजार सागांसह दोन लाख ६३ हजार ३२२ वृक्षांची अवैध कत्तल करण्यात आल्याने राज्याचे सुमारे २० कोटी ४३ लाख ५८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सागाच्या एक लाख नऊ हजार ९११ वृक्षांची कत्तल केल्यामुळे १५ कोटी ३६ लाख ७९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे वास्तव माहिती अधिकारातून उघड झाले आहे.  

विकासाच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीचे प्रमाण राज्यात वाढले आहे. यात वनक्षेत्रातील वृक्षतोडीचाही समावेश आहे. २०१९ मध्ये भारतीय वनसर्वेक्षण संस्थेचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यात देखील राज्याच्या वनक्षेत्राची स्थिती अतिशय असमाधानकारक दाखवली आहे. हा के वळ अवैध वृक्षतोडीचा आकडा आहे. सलग दोन वर्षांपासून भारतीय वनसर्वेक्षण अहवालात दर्शवली जाणारी महाराष्ट्राची स्थिती दयनीय असल्याचे आढळते. 

तत्कालीन वनमंत्र्यांनी पाच वर्षांत ५० कोटी वृक्षांची लागवड करून गिनिज बुकमध्ये विक्रम नोंदवला. या वृक्षांच्या जगण्याचे प्रमाण ७० ते ८० टक्के दाखवण्यात आले आहे, परंतु प्रत्यक्षात ते २० टक्क्यांच्या आसपास आहे.

जंगलातून किं वा जंगलालगतच्या विविध विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामानबदल खात्याकडून मंजुरी मिळवावी लागते. मागील काही वर्षांत मंजुरीचा हा वेग प्रचंड वाढला आहे. त्यासाठी लाखो वृक्षांचा बळी दिला जात आहे. त्यातच आता अवैध वृक्षतोड आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती उघडकीस आली आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेल्या माहितीत राज्याच्या वनखात्यानेच अवैध वृक्षतोडीची आकडेवारी दिली आहे. त्यात त्यांनी अवैध वृक्षतोडीमुळे झालेले नुकसान आणि काही प्रमाणात झालेल्या वसुलीची माहिती दिली आहे. मात्र, ही वसुली पैशांची आहे, प्रत्यक्षात तोडण्यात आलेली झाडे परत येणार नाहीत, त्यामुळे पर्यावरणाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.

वस्तुस्थिती काय?

’ विक्रमी ५० कोटी वृक्ष लागवडीतील झाडे जगण्याचे प्रमाण २० टक्केच

’ विकास प्रकल्पांसाठी वृक्षतोडीला वेगाने मंजुरी, लाखो वृक्षांचा बळी.  वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान

’  अहवालात वनक्षेत्राची स्थिती अतिशय असमाधानकारक असल्याची नोंद

जानेवारी २१ ते जून २१

’साग व इतर वृक्षतोड –

३७ हजार ०९१

’नुकसान – तीन कोटी २३ लाख ८० हजार रुपये

’साग वृक्षतोड – १४ हजार ४४७

’नुकसान – दोन कोटी ३५ लाख ७१ हजार रुपये

—————

सन २०२०

साग व इतर वृक्षतोड – ८६ हजार ९५८

नुकसान – सात कोटी एक लाख ८१ हजार रुपये

साग वृक्षतोड – ३६ हजार ०६१

नुकसान – पाच कोटी ३६ लाख ५८ हजार रुपये

—–

सन २०१९

साग व इतर वृक्षतोड – ६५ हजार २९३

नुकसान – चार कोटी ९२ लाख ३८ हजार रुपये

साग वृक्षतोड – २५ हजार ५२१

नुकसान – तीन कोटी ५७ लाख ४६ हजार रुपये

—-

सन २०१८ 

साग व इतर वृक्षतोड – ७३ हजार ९८०

नुकसान – पाच कोटी २५ लाख ५९ हजार रुपये

साग वृक्षतोड – ३३ हजार ८८२

नुकसान – चार कोटी सात लाख चार हजार रुपये