सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची घोषणा; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

नागपूर : गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेले वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजनेतील ३० हजार पात्र लाभार्थींच्या खात्यात दिवाळीपूर्वी सर्व मानधन जमा होणार आहे. या संदर्भात निर्णय घेण्यात आला असून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी ही घोषणा केली. वृद्ध कलावंतांना दोन वर्षापासून मानधन नसल्याबाबत बातमी लोकसत्ताने प्रकाशित केल्यानंतर सांस्कृतिक मंत्र्यांनी तात्काळ दखल घेतली.

राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊ न दोन वर्षाचा काळ होत असून विदर्भातील अनेक वयोवृद्ध कलावंत व साहित्यिकांना निवृती वेतनातंर्गत देण्यात येत असलेले मानधन देण्यात आले नसल्यामुळे अनेक ज्येष्ठ कलावंत आज आर्थिक विंवचनेत जीवन जगत आहे. राज्य सरकारच्या मानधन समितीच्या मंजुरी नंतर हे मानधन दिले जाते. पण ऑगस्ट महिन्यात समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र समितीची एकही बैठक न झाल्यामुळे हे मानधन रखडले होते. विदर्भ अवार्ड विनर्स फेलफेयर असोसिएशन याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.

मात्र लोकसत्ताने या वृद्ध कलावंतांची दखल घेतल्यानंतर सांस्कृतिक मंत्र्यांनी दिवाळीपूर्वी राज्यातील ३० हजार वृद्ध कलावंतांच्या खात्यात मानधन जमा करण्याचा निर्णय घेतला.

याबाबत अमित देशमुख यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०२१ अखेरपर्यंतचे मानधन अदा करण्यात येत असून, यासाठी २८ कोटी रुपयांची तरतूद प्राप्त झालेली आहे. राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी  राज्य शासनाकडून ही योजना सन १९५५ पासून राबवण्यात येते. अलीकडेच या  मानधनात वाढ करण्यात आली असून सद्यस्थितीत श्रेणीनिहाय  (अ श्रेणी रुपये ३१५० ,ब श्रेणी रुपये २७०० व क श्रेणीत २२५०रुपये ) मानधन दरमहा अदा करण्यात येणार आहे.