नागपूर : पर्यावरणवाद्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांना केलेला विरोध हा पर्यावरणाला हा घटक घातक असल्यामुळे होता. मात्र,सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनी पर्यावरणवाद्यांना चक्क हिंदूविरोधी ठरवले. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी शेलारांच्या या वक्तव्याचा चांगलाचा समाचार घेतला आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीवरील बंदी उठवण्यात आली. दरम्यान, पेण येथे बोलताना सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ‘काही बनावट पर्यावरणवादी संस्था हिंदू सणांच्या विरोधात भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने मांडतात. आपले उत्सव मारण्याचा प्रयत्न करतात, असे वक्तव्य केले.
ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्रा. योगेश दुधपचारं यांनी सांस्कृतिक मंत्र्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. आम्ही देशभरातील पर्यावरण शिक्षकांनी, विविध पर्यावरण संस्थांनी प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांवर बंदीचे स्वागत केले होते. या मुर्त्या पाण्यात विरघळत नाहीत, वर्षभर त्या तशाच पडून राहिलेल्या असतात, खरेतर ही देवी देवतांची विटंबना असल्यासारखे वाटते. म्हणूनच प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांऐवजी शाडूच्या मातीच्या मुर्त्या अथवा पाण्यात विरघळणाऱ्या कोणत्याही मातीच्या बनवण्याची प्रथा परंपरा शेकडो वर्षांपासून महाराष्ट्रात आणि देशात आहे.
लहानपणी मंत्री महोदयांच्या घरात सुद्धा मातीचीच मूर्ती असेल, यात शंका नाही. प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांवरील बंदी उठवायची म्हणजे नेमके काय? सांस्कृतिक मंत्री प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांना सरळ पर्यावरणाशी जोडण्यापेक्षा इतर नाहक गोष्टींशी कसे काय जोडू शकता, असा प्रश्न प्रा. योगेश दुधपचारे यांनी उपस्थित केला आहे.
मातीच्या मूर्तीमुळे फायदे
- मूर्ती पाण्यात मिसळलेली असल्याने आणि तिच्यावर रासायनिक व विषारी तत्व वापरलेले नसल्याने, ती पूर्णतः नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक आहे.
- गावातील व शहरातील कुंभार बांधवांना काम मिळतोय, त्यांच्या पोटावर लाथ मारली जात नाही. मागील शेकडो वर्षांपासून ही मंडळी याच कामावर आपली पोट भरतात.
- प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या जलचरांवर वाईट परिणाम टाकतात, नदीतील किंवा तलावातील इकॉलॉजी बदलवतात, मासेमारी समाजावर याचा वाईट परिणाम होतो. अशी स्थिती मातीच्या मुर्त्यांची नाही.
- प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती तयार करताना जिप्सम चा वापर केला जातो, तू निर्माण करताना ३०० फँरनहाईट पर्यंत त्याला तापवले जाते. त्यामुळे एखादी मातीची वीट पाण्यामध्ये फेकल्यानंतर ती जशी विरघळत नाही, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांचे होत असते. एकीकडे मातीची मूर्ती चाळीस ते पन्नास मिनिटात पाण्यात मिसळते, परंतु प्लास्टर ऑफ पॅरिस महिन्यापर्यंत किंवा कधीकधी वर्षभर पाण्यात मिसळत नाही.
- प्लास्टर पॅरिस मुळे पाण्याचा हार्डनेस वाढतो, पाणी गढूळ होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांच्या पाण्यातील विसर्जनानंतर पाण्यातील मासोळ्या मेलेल्याचे शेकडो उदाहरणे देता येतील.यापूर्वी या विषयावर सेंट्रल पोलुशन कंट्रोल बोर्ड ने वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करून प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांवर बंदी आणलेली आहे.