नागपूर : व्यवस्थेविरुद्ध साहित्यिकांच्या मनात काही आले आणि त्यांनी ते सहजपणे लिहावे, अशी स्थिती आज नाही. याचा अर्थ साहित्यिक दांभिक आहेत, असे अजिबात नाही. पण, त्यातील अनेकांना नोकरीची, मुला-बाळांची चिंता असून, सद्यस्थिती घाबरवणारी आहे. त्यामुळेच आज सरकार वा व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह तितक्या ताकदीने लिखाणात उमटलेला दिसत नाही, असे स्पष्ट मत ज्येष्ठ कवयित्री व समीक्षक प्रभा गणोरकर यांनी व्यक्त केले.

अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेच्या वतीने ‘ऐसी अक्षरे रसिके..’ हे सर्वसमावेशक साहित्य संमेलन प्रभा गणोरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच नागपुरात पार पडले. या संमेलनाच्या निमित्ताने त्या खास ‘लोकसत्ता’शी बोलत होत्या. यावेळी गणोरकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजच्या स्वरूपाविषयी खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘‘आज साहित्य रसिकांमधील संमेलनाबद्दलचे आकर्षण कमी होत आहे. ही संमेलने आपली सात्विकता गमावून बसली आहेत. संमेलनाच्या आयोजकांना श्रीमंत स्वागताध्यक्ष हवा असतो आणि स्वागताध्यक्षाला मंचावर सत्ताधारी राजकारणी. कारण, त्याला संमेलनाचे ‘भांडवल’ करून राजकारण्यांच्या मदतीने काही लाभ मिळवून घ्यायचे असतात. अशा स्थितीत मंचावरील राजकारण्यांची मने दुखावून कसे चालेल? म्हणून विरोधात बोलणाऱ्या व्यक्तीला संमेलनाच्या मंचापर्यंत पोहोचूच दिले जात नाही. यवतमाळच्या संमेलनावेळी नयनतारा सहगल यांच्याबाबतीतही असेच घडले. त्यावेळी संमेलनाध्यक्ष वा स्वागताध्यक्ष कुणीच बोलले नाही. हा त्यांच्या भीत्रेपणाचा पुरावा नाही का? ’’

मुळात सरकार हे सर्वार्थाने ‘सशक्त’ असते. त्यांना असे कमी क्षमतेच्या साहित्यिकांना वगैरे घाबरण्याचे कारण नाही. परंतु, हे साहित्यिक बोलले तर जनमतातवर प्रभाव पाडू शकतात, अशी भीती त्यांना वाटत असावी. अखिल भारतीय साहित्य महामंडळासारख्या लेखकांच्या ‘पालक’ संस्था हा हस्तक्षेप निमूटपणे सहन करीत आहेत, हे योग्य नाही. या महामंडळातले अनेक पदाधिकारी श्रीमंत आहेत. त्यांनी प्रसंगी वर्गणी गोळा करून संमेलने घ्यावीत, पण सरकारवर अवलंबून राहू नये, अशा शब्दांत प्रभा गणोरकर यांनी साहित्य महामंडळाला स्वाभिमान जपण्याचे आवाहन केले.

साहित्य व्यवहार कसा वृद्धिंगत होणार?’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता वाचकांच्या आवडीही बदलल्या आहेत. त्यांना स्वप्नरंजनातील साहित्य आवडत नाही आणि वास्तव लिहिणारे तुलनेने आजही कमीच आहेत. त्यामुळे पुस्तकांची विक्रीही कमी झाली आहे. मध्यमवर्गीयांना चांगले वाचायचे आहे, परंतु पुस्तक विकत घ्यायची त्यांची तयारी नाही. दुसरीकडे, आम्ही पैसे घेऊ अन् पुस्तक काढून देऊ, पण ती विकण्याची जबाबदारी आमची नाही,  असे प्रकाशक लेखकाला सांगतात. त्यामुळे साहित्य व्यवहार कसा वृिद्धगत होणार, असा सवालही प्रभा गणोरकरांनी उपस्थित केला.