लोकसत्ता टीम

नागपूर : ‘जिगोलो’ बनण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी एका युवकाला जाळ्यात ओढले. सुंदर महिलांचे छायाचित्र पाठवून त्याच्याकडून साडेचार लाख रुपये उकळले. फसवणुकीचा हा नवा प्रकार बेलतरोडी पोलिस ठाण्याअंतर्गत उघडकीस आला.

सायबर गुन्हेगारांनी युवकांना ‘जिगोलो’ बनण्याचे म्हणजेच उच्चभ्रू महिलांना सेवा देणारा देह व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून आकर्षित करण्यासाठी नवीन जाळे फेकणे सुरु केले. या जाळ्यात राज्यातील अनेक तरुण अडकत आहेत. पीडित वैभव (काल्पनिक नाव) हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तो पेंटिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. १९ जानेवारी २०२४ च्या दुपारी तो मनीषनगरातील एका इमारतीत काम करीत होता.

आणखी वाचा- आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग….

या दरम्यान त्याला अंकिता नावाच्या महिलेने फोन केला. तिने ‘लव्हर्स वर्ल्ड’ नावाच्या ‘मार्व्हलस सिक्युरिटी सर्व्हीस’मध्ये काम करीत असल्याचे सांगितले. तसेच, तिची कंपनी पुरुष वेश्या सेवा चालवते, ज्याला सामान्य भाषेत ‘जिगोलो’ म्हणतात. जर तो उच्चभ्रू घरातील महिलांना सेवा देण्यास तयार असेल तर त्याला चांगले पैसे मिळतील. त्या महिला स्वत: त्याला फोन करतील. त्याला मिळणाऱ्या पैशातून ३० टक्के कमिशन कंपनीला द्यावे लागेल आणि उर्वरित सर्व पैसे त्याचे असतील. ही रक्कम ५ हजार ते २० हजारपर्यंत असू शकते, अशी माहिती दिली. पैशांच्या आमिषाला बळी पडून वैभव काम करण्यासाठी तयार झाला. त्याला नोंदणी करण्यासाठी एक ‘क्यूआर कोड’ पाठविण्यात आला आणि ८५० रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. वैभवने यूपीआयद्वारे पैसे वळते केले.

त्यानंतर आरोपींनी कधी वैद्यकीय तपासणीच्या नावावर तर कधी परवाना, सुरक्षा कार्ड, जीएसटी असे विविध कारण सांगत त्याच्याकडून पैसे उकळले. मजूर असलेल्या वैभवने मोलमजुरी करून जमा केले पैसेच गमावले नाहीतर पत्नीचे दागिनेही मणप्पूरम फायनांस कंपनीत गहाण ठेवून कर्ज घेतले. अशाप्रकारे २० दिवसांत त्याने आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये त्याने एकूण ४ लाख ४८ हजार रुपये जमा केले. मात्र, त्याला कुठल्याही महिलेकडे पाठविले नाही किंवा त्याला सेवा देण्याची संधी मिळाली नाही, त्याला रक्कमही मिळाली नाही. त्यामुळे फसवणूक होत असल्याचे वैभवच्या लक्षात आले. त्याने बेलतरोडी पेालिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

आणखी वाचा- तडसांना उमेदवारी अन् पक्षांतर्गत कुरबुर, फडणवीस व बावनकुळे घेणार आज झाडाझडती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झारखंड-बिहारची टोळी सक्रिय

अशा पध्दतीची टोळी झारखंड-बिहारच्या येथील असून, या टोळीने बिहार, उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब, झारखंड, ओडिशा, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी राज्यांतील हजारो लोकांची फसवणूक केली आहे. मात्र, इभ्रत, कुटुंब, समाजाच्या भीतिपोटी तक्रारदार पुढे येण्यास तयार नाहीत. या टोळीतील आठ लोक पोलिसांच्या जाळ्यात असले तरी देशभरातील विविध सायबर टोळ्यांनी हा फंडा उचलला आहे. त्याच सारखी पध्दत नागपुरात वापरून पेंटरची फसवणूक करण्यात आली.